मुंबई । गुरुवारी(25 सप्टेंबर) विराट कोहली, एबी डिव्हिलियर्ससारखे धुरंधर खेळाडू असूनही आरसीबी संघ 20 षटकेदेखील खेळू शकला नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुध्द दारुण पराभव पत्करावा लागला. पंजाबने बेंगलोरचा 97 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकांत 206 धावा केल्या त्यानंतर 207 धावांचा पाठलाग करताना बेंगलोरचा संघ 109 धावांत गुंडाळला गेला. पहिला सामना जिंकणारा आरसीबीचा संघ दुसर्या सामन्यात पराभूत का झाला? याची 5 प्रमुख कारणे जाणून घ्या.
1. बेंगलोरच्या पराभवाचे पहिले सर्वात मोठे कारण म्हणजे चुकीचा संघ निवड. बेंगलोरच्या संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय मिळविला होता, परंतु त्यांचा वेगवान गोलंदाज उमेश यादवची कामगिरी अत्यंत खराब होती. तो योग्य लयीत दिसत नव्हता आणि पहिल्या सामन्यात त्याने 48 धावा दिल्या. असे असूनही, आरसीबीने त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले. उमेश यादवने पंजाबविरुद्ध देखील 3 षटकांत 35 धावा दिल्या.
2. बेंगलोरच्या पराभवाचे दुसरे मोठे कारण म्हणजे त्यांचे खराब क्षेत्ररक्षण. कर्णधार विराट कोहलीने केएल राहुलला दोन जीवदान दिले. राहुल 83 आणि 89 धावांवर असताना कोहलीने त्याचे दोन सोपे झेल सोडले, त्यानंतर राहुलने शेवटच्या 10 चेंडूंमध्ये 44 धावा फटकावल्या आणि पंजाब संघाने 206 धावांपर्यंत मजल मारली. सामना संपल्यानंतर स्वत: कर्णधार कोहलीने आपली चूक कबूल केली.
3. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या गोलंदाजीची डेथ ओव्हरमध्ये त्रेधातिरपीट उडाली. शेवटच्या 3 षटकांत बेंगलोरच्या गोलंदाजांनी 70 धावा केल्या. 18 व्या षटकात सैनीने 11 धावा दिल्या. यानंतर डेल स्टेनने 19 षटकात 26 धावा दिल्या. शिवम दुबेने शेवटच्या षटकात 23 धावा दिल्या. पंजाबने शेवटच्या 3 षटकांत एकूण 5 षटकार आणि 6 चौकार ठोकले.
4. 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगलोरच्या संघाने खेळपट्टीवर थांबण्याचा देखील प्रयत्न केला नाही. युवा सलामीवीर देवदत पडिक्कलने वेगाने खेळण्याच्या नादात पहिल्या षटकात आपली विकेट गमावली. फिलिप्स आणि विराट कोहली यांनीही अशीच चूक केली. परिणामी बंगळुरूने 4 धावांत 3 गडी गमावले. विकेट पडल्यामुळे बेंगलोरवर लगेच दबाव आला आणि परिणामी संघाचा पराभव झाला.
5. यापूर्वीच्या चुकांचा धडा घेत किंग्ज इलेव्हन पंजाब व्यवस्थापनाने त्यांच्या उत्कृष्ट प्लेइंग इलेव्हनला बंगळुरूविरुद्ध संधी दिली. मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेने एम अश्विन आणि रवी बिश्नोई म्हणून दोन लेगस्पिनरला स्थान दिले. या दोन्ही खेळाडूंनी मिळून सहा विकेट्स घेतल्या. याशिवाय कॉट्रोल आणि शमीच्या धारदार गोलंदाजीनेही पंजाबचा विजय निश्चित केला.