संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामाचे जेतेपद मुंबई इंडियन्सने पटकावले. दुबईत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलसचा पराभव करून पाचव्यांदा जेतेपद जिंकले. स्पर्धेचा पहिला सामना गमावल्यानंतर मुंबईने जबरदस्त पुनरागमन केले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. मुंबईच्या पाच खेळाडूंनी संघाला चॅम्पियन बनविण्यात मोलाची कामगिरी पार पडली.
जसप्रीत बुमराहः
मुंबईचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या गोलंदाजीने मुंबईला या हंगामातील काही सामन्यात विजय मिळवून दिला. बुमराहने आपल्या अचूक गोलंदाजीने आणि वेगाने विरोधी फलंदाजांना घाबरवून सोडले . त्याने या हंगामातील 15 सामन्यांत शानदार गोलंदाजी केली आणि 15 च्या सरासरीने 27 बळी घेतले. या दरम्यान त्याने दोनदा चार बळीही घेतले.
ट्रेंट बोल्ट:
दिल्ली संघातून मुंबई इंडियन्समध्ये आलेल्या बोल्टने या हंगामात पॉवरप्लेमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. एवढेच नव्हे, तर डेथ ओव्हर्समध्येही त्याने आपल्या गोलंदाजीने छाप सोडली. या हंगामात मुंबईकडून खेळलेल्या 15 सामन्यांत बोल्टने 25 बळी घेतले. या हंगामात त्याने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक 16 बळी घेतले आहेत.
ईशान किशन:
मुंबईचा युवा फलंदाज ईशान किशनला सलामीच्या सामन्यात संघात स्थान मिळाले नाही. परंतु त्यानंतर त्याने मिळालेल्या संधीचा लाभ घेतला. ईशानने या हंगामात बरेच षटकार ठोकले. एवढेच नव्हे, तर त्याने काही सामन्यात संघाला विजयही मिळवून दिला. ईशानने या हंगामात मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने 14 सामन्यात 57 च्या सरासरीने आणि 145 च्या स्ट्राइक रेटने 516 धावा केल्या. या हंगामात त्याने चार अर्धशतकेही ठोकली आहेत. तसेच सर्वाधिक 30 षटकारही मारले.
क्विंटन डिकॉक :
मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉक सलामीच्या सामन्यामध्ये लवकरच तंबूत परतला होता. परंतु त्यानंतर त्याने काही सामन्यांत मोठे डाव खेळले. या हंगामात डिकॉकने 16 सामन्यात 36 च्या सरासरीने आणि 140 च्या स्ट्राइक रेटने 503 धावा केल्या. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश होता. इतकेच नव्हे, तर डिकॉकने यष्टीमागेही चांगली भूमिका बजावली. त्याने 18 झेल घेतले आणि चार स्टंपिंग्स केले.
सूर्यकुमार यादवः
गेल्या काही हंगामापासून उत्तम प्रदर्शन करणाऱ्या सूर्यकुमार यादवने या हंगामातही छाप सोडली. यावेळी त्याने मधल्या फळीत फलंदाजी करत मोठे डाव खेळले आणि संघाला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारने 16 सामन्यांत 40 च्या सरासरीने आणि 145 च्या स्ट्राइक रेटने 480 धावा केल्या. या मध्ये 4 अर्धशतकांचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्मा आयपीएलमध्ये ‘हा’ भीमपराक्रम करणारा एकमेव खेळाडू
मुंबईच्या फलंदाजांच्या नावे अनोखा विक्रम; विराट, डिव्हिलियर्स आणि गेलच्या कामगिरीची पुनरावृत्ती