भारतीय संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) त्याच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने क्रिकेट कारकिर्दीत १०० शतके ठोकली आहेत. त्याचा हा विक्रम आजही कोणत्याही फलंदाजाला तोडता आलेला नाहीये. त्याला त्याच्या विक्रमांमुळे जगभरात ‘गॉड ऑफ क्रिकेट’ (God of Cricket) म्हणजेच ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखले जाते. त्याला जगभरात सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जाते. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) १०० शतके ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकरला ‘महान’ मानत नाही. त्याने नुकतेच जगातील ५ सर्वोत्तम फलंदाजाची निवड केली. त्यात त्याने सचिनच्या नावाचा समावेशच केलेला नाहीये. कोण आहेत ते खेळाडू चला पाहूया…
शेन वॉर्नसाठी सचिन नाही, तर ‘हा’ आहे जगातील सर्वोत्तम फलंदाज
खरं तर, क्रिकेटच्या इतिहासात शेन वॉर्न आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. दुसरीकडे सचिननेही आपल्या फलंदाजीने क्रिकट रसिकांचे मन जिंकले आहे. असे असले, तरीही क्रिकेटच्या मैदानावर या दोन्ही खेळाडूंमध्ये काहीतरी बिनसल्याचे पाहायला मिळायचे. अशात आता वॉर्नने सचिन नाही, तर ऑस्ट्रेलियाचाच फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला जगातील सर्वोत्तम कसोटी फलंदाज सांगितले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये ७००० धावा करणाऱ्या स्टीव्ह स्मिथला वॉर्नने आपल्या यादीत अव्वल क्रमांकावर ठेवले आहे. त्याने फक्त कसोटी क्रिकेटमधील धावांच्या आधारावर सचिनला दुर्लक्षित केले आहे.
“माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्मिथने अनेक कठीण परिस्थितीत धावा केल्या आहेत. मला स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानी वाटतो. माझा असा विश्वास आहे की, सर्व प्रकारच्या परिस्थितीत सर्व गोलंदाजांविरुद्ध तो शानदार खेळला आहे,” असे वॉर्न म्हणाला.
जगातील सर्वोत्तम ५ फलंदाजांची निवड करताना त्याने अव्वलस्थानी स्मिथला, तर दुसऱ्या स्थानी जो रूटला, तिसऱ्या स्थानी केन विलियम्सन, चौथ्या स्थानी विराट कोहली आणि पाचव्या स्थानी मार्नस लॅब्युशेनला ठेवले आहे.
सचिन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द
भारतातच नाही, तर जगभरात सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमधील योगदान कधीही विसरले जाऊ शकत नाही. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २०० कसोटी सामने, ४६३ वनडे सामने आणि १ आंतरराष्ट्रीय टी२० सामना खेळला आहे. कसोटीत त्याने ५३.७८ च्या सरासरीने १५९२१ धावा, वनडेत ४४.८३ च्या सरासरीने १८४२६ आणि आंतरराष्ट्रीय टी२०त १० धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याने वनडेत पुरुषांच्या क्रिकेटमध्ये सर्वप्रथम द्विशतकही ठोकले आहे. हा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे. त्याच्या या कामगिरीमुळेच त्याला भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणारा तो सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू आहे.