आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाज असो वा फलंदाज, प्रत्येकजण आपली वेगळी ओळख निर्माण करायचा प्रयत्न करत असतो. त्यातही आपल्या खेळाचा ठसा कसा उमटवता येईल, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. यांपैकीच एक प्रसिद्ध खेळाडू म्हणजे, ऑस्ट्रेलिया संघाचे वेगवान गोलंदाज ‘ग्लेन मॅकग्रा’ होय. आज (९ फेब्रुवारी) त्यांचा ५४ वा वाढदिवस.
९ फेब्रुवारी १९७० ला जन्माला येणाऱ्या मॅकग्रा यांचे नाव जगातील महान वेगवान गोलंदाजांच्या यादीत घेतले जाते. त्यांची गोलंदाजी अशी होती की, सचिन तेंडूलकर, ब्रायन लारा आणि राहुल द्रविड सारखे फलंदाज देखील त्यांना घाबरत असत आणि त्यांच्या समोर सांभाळून फलंदाजी करत असत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे वेगवान गोलंदाज
मॅकग्रा यांनी ऑस्ट्रेलिया संघाकडून १९९३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर २००७ पर्यंत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्त्व करताना त्यांना एकूण ३७६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. यादरम्यान त्यांनी एकूण ९४९ विकेट्स हस्तगत केल्या होत्या. श्रीलंकन दिग्गज मुथैय्या मुरलीधरन (१३४७), ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न (१००१) आणि भारतीय दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे (९५६) नंतर क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मॅकग्रा यांचा चौथा क्रमांक लागतो. तर वेगवान गोलंदाजांच्या बाबतीत, ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे अव्वल गोलंदाज आहेत.
विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स
विशेष म्हणजे, विश्वचषकात सर्वाधिक ७१ विकेट्स घेण्याचा त्यांचा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही. सन १९९९, २००३ आणि २००७ च्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा ते भाग होते. याबरोबरच विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. हा विक्रम त्यांनी २००३ च्या विश्वचषकामध्ये नामबिया विरोधात केला होता.
शून्यावर बाद केले सर्वाधिक फलंदाज
मॅकग्रा यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीत सर्वाधिक १०४ फलंदाजांना भोपळाही न फोडू देता तंबूचा रस्ता दाखविला आहे. यासह क्रिकेटजगतात सर्वाधिक फलंदाजांना शून्यावर बाद करण्याचा खास विक्रमाची त्यांच्या नावावर नोंद आहे. त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर श्रीलंकाचा माजी फिरकीपटू मुथैया मुरलीधरन यांचे नाव येते, ज्यांनी १०२ फलंदाज शून्यावर बाद केले आहेत.
संघसहकारी का बोलायचे ‘कबूतर’?
मॅकग्रा जेव्हा क्रिकेटजगतात आले होते, तेव्हा ते शरीराने खूप बारीक होते आणि त्यांचे पायसुद्धा कमकुवत होते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रॅड मॅकनमारा यांनी मॅकग्रा यांना मस्तीमध्ये तू कबूतराचे पाय चोरून आला आहेस का? असे म्हंटले होते आणि तेव्हापासूनच मॅकग्रा यांना कबूतर टोपणनावाने ओळखले जाऊ लागले.
महत्त्वाच्या बातम्या –
U19 World Cup । उपांत्य सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव, भारत सलग पाचव्यांना खेळणार वर्ल्डकप फायनल मोठी बातमी! अर्जुन पुरस्कार विजेत्या हॉकीपटूवर बलात्काराचे आरोप! दोन दिवसांपूर्वीच झालेली डीएसपी पदी नियुक्ती