या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात डिसेंबर 2020मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका (4 Matches of Test Series) सुरु होईल. या मालिकेतील एक सामना दिसव-रात्र(Day-Night Test Match) होणार आहे. या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने संमती दिली आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ (Steve Waugh) यांना आनंद झाला असून त्यांनी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) या निर्णयासाठी धन्यवाद म्हटले आहे.
मागील वर्षी भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायदेशात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 ने पराभूत करून ऐतिहासिक विजय मिळविला होता. पण आता वॉ यांना असे वाटते की, यावर्षी भारतीय संघासाठी असा विजय पुन्हा मिळविणे सोपे नसेल. वॉ यांनी त्याची कारणेही सांगितली आहेत.
वॉ यांना असा विश्वास आहे की, यावेळी जेव्हा भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी येईल, तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाकडून भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागेल. कारण या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ऑस्ट्रेलियाच्या संघात असणार आहेत. तसेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची सुधारलेली गोलंदाजीही याला कारणीभूत ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
“मला असे वाटते की, यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी मालिका जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असेल. आम्हाला खेळपट्टीबद्दल चांगल्याप्रकारे माहिती आहे. तसेच दिवस-रात्र कसोटी सामना भारतासाठी नवीन असेल,” असे कसोटी मालिकेबद्दल बोलताना वॉ म्हणाले.
“ज्याप्रकारे भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) हे आव्हान स्विकारत आहे, त्यामुळे मला चांगले वाटत आहे. जर तुम्हाला जगातील सर्वोत्कृष्ट संघ बनायचे असेल तर तुम्हाला देशाबाहेर जास्तीत जास्त कसोटी सामने जिंकावे लागतील,” असेही वॉ यावेळी म्हणाले.
भारताच्या मागील कसोटी विजयाचे कारण सांगताना वॉ म्हणाले की, “मागील कसोटी मालिकेतील भारताच्या विजयाचे श्रेय तुम्ही हिसकावून घेऊ शकत नाही. परंतु त्या वेळी ऑस्ट्रेलियन संघाकडे त्यांचे उत्कृष्ट फलंदाज नव्हते.”
‘यावेळी संघात मार्नस लॅब्यूशाने (Marnus Labuschagne) आहे. तसेच ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी पहिल्यापेक्षा जास्त संतुलित वाटत आहे. याशिवाय भारतीय संघही कमजोर नाही. त्यामुळे ही कसोटी मालिका खूपच रंजक असेल,’ असेही वॉ म्हणाले.
https://twitter.com/Maha_Sports/status/1229345865338408960
https://twitter.com/Maha_Sports/status/1229336642437238784