श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाल्यापासून फलंदाज ऋतुराज गायकवाड सातत्याने चर्चेत आहे. चांगली कामगिरी करून देखील गायकवाडची श्रीलंका मालिकेसाठी निवड झाली नाही. त्यानं गेल्या 12 टी20 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये 62.25 च्या सरासरीनं आणि 150 च्या स्ट्राइक रेटनं 498 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्यानं चार वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा काढल्या. ऋतुराजनं अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 77 आणि 49 धावा केल्या होत्या. आता ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात निवड न झाल्यानंतर माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत यांनी भारतीय संघ व्यवस्थापनावर ताशेरे ओढले आहेत.
श्रीकांत म्हणाले की, प्रत्येक खेळाडूचं नशीब शुभमन गिलसारखं नसतं. गिलला केवळ श्रीलंका मालिकेत स्थानच मिळालं नाही, तर त्याला दोन्ही फॉरमॅटमध्ये उपकर्णधारपदही देण्यात आलंय. गायकवाडच्या तुलनेत गिलचे टी20 आकडे काही खास नाहीत. गिलनं गेल्या 19 टी20 डावांमध्ये 29.7 च्या सरासरीनं आणि 139.5 च्या स्ट्राइक रेटनं 505 धावा केल्या आहेत.
के श्रीकांत आपल्या युट्यूब चॅनेलवर म्हणाले, “ऋतुराज गायकवाडची टी20 संघात आपोआप निवड व्हायला हवी होती. आता त्यानं अधिक धावा केल्या पाहिजे आणि निवडकर्त्यांचं लक्ष वेधलं पाहिजे. कारण प्रत्येकाचं नशीब शुभमन गिल प्रमाणे चांगलं नसतं.”
भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. यानंतर दोन्ही संघ 2 ऑगस्टपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवची भारतीय टी20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या दौऱ्यापासून गौतम गंभीर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमारला कर्णधार बनवल्यानंतर संघ निवडीत त्याची छाप दिसून आली. टी20 इंटरनॅशनलमधून निवृत्त झालेले रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय मालिकेत खेळणार आहेत. एकदिवसीय संघात रियान पराग आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा हे दोन नवे चेहरे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयचा योग्य निर्णय, रवींद्र जडेजाला एकदिवसीय संघातून वगळण्याची 3 कारणं जाणून घ्या
फक्त 3 वर्षांत टीम इंडियाने पाहिलेत तब्बल 11 कर्णधार! चौघे आहेत महाराष्ट्रीयन…
“त्याला कर्णधारपद मिळायला हवं होतं”, हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ उतरला माजी क्रिकेटपटू; गंभीरवरही उघडपणे बोलला