रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा आयपीएल 2023 हंगामातील प्रवास रविवारी (दि. 21 मे) संपुष्टात आला. या हंगामात आरसीबी संघाने संमिश्र कामगिरी केली. संघासोबतच यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याच्यासाठीही हा हंगाम तितका चांगला ठरला नाही. त्याच्या खराब कामगिरीवर माजी खेळाडूही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यामध्ये टॉम मूडी यांचेही नाव जोडले गेले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कार्तिकसाठी हा शेवटचा हंगाम असू शकतो.
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याच्या आयपीएल 2023 हंगामातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर तो लक्षवेधी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याला 14 सामने खेळण्याची संधी मिळाली, पण यादरम्यान तो 134.62च्या स्ट्राईक रेटने फक्त 140 धावाच करू शकला. याव्यतिरिक्त त्याच्या नावावर खराब विक्रमाचीही नोंद झाली. आयपीएल इतिहासात तो सर्वाधिक 17 वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी असून त्याच्या नावावर 16 वेळा शून्यावर बाद होण्याच्या विक्रमाची नोंद आहे.
काय म्हणाले मूडी?
टॉम मूडी (Tom Moody) यांनी भीती व्यक्त करत म्हटले की, दिनेश कार्तिक याच्यासाठी हा शेवटचा हंगाम ठरू शकतो. माध्यमांशी बोलताना मूडी म्हणाले की, “दिनेश कार्तिकसाठी हा हंगाम खूपच साधारण ठरला. कदाचित तुम्हाला हेदेखील वाटेल की, त्याचा हा शेवटचा हंगाम तर नसेल ना.”
यापूर्वी आरसीबी संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) यानेही दिनेश कार्तिक याच्या फॉर्मविषयी चिंता व्यक्त केली होती. त्याने म्हटले की, आरसीबीला यावेळी एक शानदार फिनिशरची उणीव भासली.
सामन्यानंतर फाफ म्हणाला की, “आम्हाला सामना फिनिश करण्यात सुधारणा करावी लागेल. खासकरून अखेरीस वेगाने धावा करण्याची गरज आहे. मागील वर्षी दिनेश कार्तिक जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि चांगल्याप्रकारे सामना फिनिश करत होता. मात्र, यावेळी तो त्या हिशोबाने धावा करू शकला नाही.”
दिनेश कार्तिक या हंगामात एकही अर्धशतक झळकावू शकला नाही. हंगामातील 30 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. याव्यतिरिक्त त्याला 13 चौकार आणि फक्त 5 षटकारच मारता आले. (former cricketer tom moody reacts on dinesh karthik s disappointing ipl 2023 campaign)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL 2023च्या पहिल्या क्वालिफायरसाठी चेन्नई-गुजरात सज्ज, एकाच क्लिकवर जाणून घ्या सर्व माहिती
‘आम्ही सलग दुसऱ्यांदा फायनल…’, RCBचे स्वप्न धुळीस मिळवल्यानंतर गिलचे पहिल्या क्वालिफायरबद्दल भाष्य