सोमवारी (८ मार्च) इंग्लंड क्रिकेट जगताला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जोई बेंजामिन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांनी १९९० च्या दशकात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते.
इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांना संघर्ष करायला लावत एकाच वर्षात तब्बल ८० गडी बाद करणाऱ्या गोलंदाज जोई बेंजामिन यांनी वयाच्या ६० व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आहे. त्यांनी इंग्लंड संघासाठी १९९४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु, त्यांना एकच कसोटी सामना खेळायची संधी मिळाली. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यात त्यांनी ४ गडी बाद केले होते.
त्यांची १९९४ सालीच इंग्लंडच्या एकदिवसीय क्रिकेट संघात देखील निवड झाली होती. परंतु, त्यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. २ सामने खेळत त्यांनी खेळाडू एकच गडी बाद केला होता.
तसेच वयाच्या २७ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बेंजामिन यांनी सुरुवातीच्या काळात वार्विकशर या संघाकडून क्रिकेट खेळले. त्यानंतर त्यांना १९९२ मध्ये सरे संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. याच संघातून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांना इंग्लंड संघासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी मिळाली होती.
बेंजामिन यांनी प्रथम श्रेणी आणि अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये मिळून तब्बल ५६० गडी बाद केले होते. १९९२ च्या हंगामात त्यांनी सरे संघाकडून खेळताना एकूण ६४ गडी बाद केले होते. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण १२६ सामने खेळले आहेत. यात त्यांनी ३८७ गडी बाद केले आहेत. तसेच त्यांनी खेळलेल्या १६८ अ दर्जाच्या क्रिकेट सामन्यांमध्ये १७३ गडी बाद केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
झारखंडच्या ‘या’ मंदिरात झहीरला सपत्नीक पाहून उसळली चाहत्यांची गर्दी; पाहा फोटो
कसोटी क्रमवारी: रिषभ पंतची पहिल्या १० फलंदाजांमध्ये एन्ट्री; रोहित शर्मासह ‘या’ क्रमांकावर विराजमान






