चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी आपल्या करिष्माई नेतृत्वासाठी ओळखला जातो. मैदानावर त्याने आपल्या नेतृत्वाने घेतलेल्या अचूक निर्णयांनी संघाला अनेकदा अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळेच तो आजही जागतिक क्रिकेटमधील एक सर्वात यशस्वी आणि सार्वकालीन महान कर्णधार समजला जातो.
मात्र धोनी केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेर देखील नेतृत्वाची जबाबदारी पार पाडत असतो. याचा प्रत्यय नुकताच आला होता. आयपीएल २०२१ रद्द झाल्यानंतर अनेक खेळाडूंना घरी परतण्यासाठी अडचणी येत आहेत. याच संदर्भात एक निर्णय घेत धोनीने सगळ्यांची मने जिंकली होती. आता त्याच्या या निर्णयाची माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी विशेष शब्दात स्तुती केली आहे.
खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी घेतला निर्णय
एक कर्णधार म्हणून मैदानासह मैदानाबाहेर देखील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. खेळाडूंची काळजी मैदानातच नाही तर मैदानाबाहेर देखील घ्यावी लागते. हीच बाब लक्षात घेऊन धोनीने आयपीएल रद्द झाल्यावर चेन्नईच्या खेळाडूंसाठी एक निर्णय घेतला होता. यानुसार चेन्नईचे सगळे खेळाडू जोपर्यंत घरी परतत नाहीत, तोपर्यंत धोनीने देखील घरी न जाण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या एका पदाधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली होती.
त्यानंतर सर्वच स्तरातून धोनीच्या या निर्णयाचे कौतुक झाले होते. यात जाफर यांनी उडी घेत त्याच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटवर द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रातील धोनीच्या वृत्ताचे कात्रण जोडत ट्विट केले आहे.
त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘संघातील सर्व खेळाडू सुरक्षित घरी परतेपर्यंत तिथे थांबणे आणि आपले काम संपवूनच घरी जाणे, हे काम एकटा धोनीच करु शकतो.’ यापुढे त्यांनी हात जोडून सलाम करतानाचा इमोजीही टाकला आहे.
https://twitter.com/WasimJaffer14/status/1390367562995703809?s=20
चेन्नई सुपर किंग्जचे या हंगामात दमदार प्रदर्शन
धोनीच्या आणि त्याच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई संघाची कामगिरी यंदा दमदार राहिली आहे. आयपीएल स्थगित होण्यापुर्वी धोनीचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसले. हंगामातील पहिलीच लढत गमावल्यानंतर चेन्नई संघाने दमदार पुनरागमन केले होते. आयपीएल २०२१ स्थगित होण्यापुर्वी चेन्नईने ७ सामने खेळले होते. यातील तब्बल ५ सामने जिंकत हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोहली, धवन की अजून कोणी; टी२० विश्वचषकात रोहितचा सलामी जोडीदार कोण असेल?