गेल्या कित्येक महिन्यांपासून क्रिकेट चाहते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान साउथम्प्टनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ आमने सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू वीवीएस लक्ष्मण यांनी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाबाबत भाष्य केले आहे.
भारतीय संघासाठी १३४ कसोटी सामने आणि ८६ एकदिवसीय सामने खेळणारे दिग्गज क्रिकेटपटू वीवीएस लक्ष्मण यांनी स्पोर्ट्स स्टारसोबत चर्चा करताना म्हटले की, “माझ्या मते परदेशात मिळवलेल्या विजयासाठी अधिक गुण द्यायला हवे. तसेच प्रत्येक संघाला एकसारखे सामने खेळण्याची संधी मिळायला हवी. कुठल्या संघाला जास्त सामने खेळण्याची संधी मिळते तर कुठला संघ कमी सामने खेळूनच अंतिम फेरी गाठतो, हे योग्य नाहीये.” लक्ष्मणच्या मते इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन या संघांना पराभूत करणे सोपे नाहीये.
तसेच ते पुढे म्हणाले की, “विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत किती सामने खेळवले जातील हे निश्चित केले गेले नव्हते. परंतु मालिका किती खेळायच्या आहेत हे निश्चित होते. प्रत्येक संघाला या स्पर्धेत एकूण ६ मालिका खेळायच्या होत्या, ३ मायदेशात आणि ३ परदेशात. परंतु गुण हे सामन्यांच्या आधारेच दिले जातात. जर सामन्यांची संख्या ठरवली गेली तर एक योग्य आकडा समोर येऊ शकतो. यावेळी न्यूझीलंड संघ अंकाच्या बाबतीत पिछाडीवर असला तरीही अंतिम फेरीत पोहोचला होता. अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघाची निवड करण्यासाठी सरासरी गुणांचा वापर करण्यात आला.”
“विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी न्यूझीलंड संघाला दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे न्यूझीलंड संघाचे पारडे या सामन्यात जड असेल. परंतु हा सामना आठवणीचा ठरेल. त्यामुळे विराट कोहली आणि केन विलियमसन दोघेही जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. आपण नेहमी एमएस धोनीची आठवण काढतो की, त्याने पहिला टी-२० विश्वचषक जिंकला. मला अजूनही तो क्षण आठवतो जेव्हा कपिल देव यांनी १९८३ विश्वचषक स्पर्धेचे चषक उचलले होते. कारण भारतीय संघाचा हा पहिला विश्वचषक होता,” असे त्यांनी शेवटी म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
अनुभवी यष्टीरक्षकाचे बडेबोल; कारण सांगत म्हणाला, ‘जगभरातील संघ रिषभच्या नावालाही घाबरत आहेत’
भारताकडून ३४९ विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाचा गोलंदाजीबाबतचा ‘हा’ सल्ला विराटसेना लावणार मार्गी!
वनडेत ६ धावा देत ५ विकेट्स घेणारा खेडेगावातील सुपरस्टार ‘सुनिल जोशी’