विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेची जोरदार सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या सलग ४ सामन्यात विजय मिळवणाऱ्या बेंगलोर संघाला आयपीएल २०२१ चे जेतेपद पटकाविण्यासाठी प्रबळ दावेदार मानले जाते आहे. आज (२५ एप्रिल) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बेंगलोर संघाची लढत चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत होणार आहे. अशात माजी भारतीय कर्णधार सुनिल गावसकरांनी ग्लेन मॅक्सवेलबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात सुनील गावसकर यांनी म्हटले की, “ही एक चांगली बाब आहे की, ग्लेन मॅक्सवेल चांगली कामगिरी करत आहे. यामुळे विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांच्यावरील फलंदाजीचा ताण कमी होत आहे. आता या दोघांनाही माहीत आहे की, ते आणखी एका फलंदाजावर विश्वास ठेऊ शकतात जो संघासाठी धावा करू शकतो. गतवर्षी देवदत्त पडीक्कल होता जो संघासाठी चांगली सुरुवात करून देत होता. आता ग्लेन मॅक्सवेल आहे, जो अशी कामगिरी करत आहे.”
बेंगलोरकडे डिविलियर्स सोबत आणखी एक ३६० डिग्री खेळाडू
तसेच ते पुढे म्हणाले की, “आता तुम्ही असंही म्हणू शकता की, बेंगलोर संघाकडे मॅक्सवेलच्या रुपात आणखी एक ३६० डिग्री शॉट खेळणारा खेळाडू आहे. ज्याप्रकारे तो रिव्हर्स स्कूप शॉट खेळतो. यासोबतच तो ऑफ साईडच्या चेंडूला स्कूप करतो. तसेच तो लेग साईडच्या दिशेनेही चांगली फटकेबाजी करतो. तो हे शॉट्स खूप चांगल्याप्रकारे खेळत आहे. तो मागे फिरून स्कुप शॉट देखील खेळतो. याचा अर्थ हाच आहे की, तो आणखी एक ३६० डिग्री खेळाडू आहे. आता गोलंदाज करणार तरी काय, जेव्हा दोन दोन ३६० डिग्री खेळाडू समोर असतील.”
ग्लेन मॅक्सवेलने या हंगामात ४ सामन्यात फलंदाजी केली आहे. यात त्याने १७६ धावा केल्या आहेत. यासोबतच त्याने २ सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. तसेच ७८ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याने या हंगामात १७ चौकार आणि ८ षटकार लगावले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ग्लेन मॅक्सवेलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नाणेफेकीचा कौल सीएसकेच्या पारड्यात, धोनी आणि विराटच्या संघात झाले ‘हे’ प्रमुख बदल