भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या सुट्टीवर आहेत. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय संघाला आता थेट सप्टेंबरच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध पुढील मालिका खेळायची आहे. त्याआधी खेळाडू एकतर विश्रांती घेत आहेत किंवा त्यांच्या राज्यातील लीगमध्ये भाग घेत आहेत. असे असताना भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने बांगलादेश विरुद्धच्या मालिकेआधी भारतीय संघाला सावधानतेचा इशारा दिला आहे.
मोठ्या कालावधीनंतर भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने आपली पूर्ण ताकद लावावी. तसेच पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरावे असे रैना याने सुचवले. रैना म्हणाला, “बांगलादेश संघाला हलक्यात घेता येणार नाही. कारण त्यांच्याकडे उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत. मालिकेतील दुसरा सामना कानपूर येथे होत असल्याने विशेष खबरदारी घ्यावच लागेल. त्यांचे अनेक खेळाडू मागील काही काळापासून सातत्यपूर्ण कामगिरी करतायेत.”
रैना याच्या म्हणण्यानुसार या मालिकेत एक मजबूत संघ उतरवून भारत आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करू शकतो. तत्पूर्वी, भारताला न्यूझीलंडविरुद्ध देखील कसोटी मालिका खेळायची आहे.
बांगलादेश संघ सध्या उत्कृष्ट कामगिरी करत असून, त्यांनी नुकताच पाकिस्तान दौऱ्यावर पहिल्या कसोटीत विजय साजरा केला. त्यांनी प्रथमच पाकिस्तानला कसोटी क्रिकेटमध्ये पराभूत करण्याची कामगिरी केली. भारत दौऱ्यावर बांगलादेशच्या शाकीब अल हसन, मुशफिकूर रहीम व मेहदी हसन यांच्यावर विशेष नजर असणार आहे.
भारतीय संघाला नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. जिथे ते पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. यावेळी पर्थमधून मालिकेला सुरुवात होणार आहे. याशिवाय ऍडलेड, ब्रिस्बेन, मेलबर्न आणि सिडनी येथेही कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करेल. तसेच, नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यापुढे ही मालिका जिंकण्याचे सर्वात मोठे लक्ष असेल.
हेही वाचा –
शतक झळकावत जो रुटने केली ॲलिस्टर कुकची बरोबरी, आता गावसकरांच्या विक्रमावर नजर
रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्येच कायम राहणार? MI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आयपीएल 2024 ला मिळाली विक्रमी लोकप्रियता! जिओ सिनेमानं मोडले पूर्वीचे सर्व रेकॉर्ड