इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट सध्या चांगल्या लयीत आहे. श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले आहे. रुटने लॉर्ड्सवर कसोटी कारकिर्दीतील 33 वे शतक झळकावले आहे. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विलियम्सन यांचे विक्रम मागे टाकले आहेत. स्मिथ आणि विलियम्सन यांच्या नावावर कसोटीत 32-32 शतके आहेत. तसेच रूटने इंग्लंडचा माजी सलामीवीर ॲलिस्टर कुकच्या इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतकांची बरोबरी केली आहे. आता भारताचे माजी कर्णधार व लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांचा विक्रम मागे टाकण्याचे त्याचे लक्ष्य असेल.
उजव्या हाताचा फलंदाज जो रूटने गुरुवारी (29 ऑगस्ट) 162 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने 12 चौकार मारले. लॉर्ड्सवरील त्याचे हे सहावे शतक आहे. सुनील गावस्कर, ब्रायन लारा, माहेला जयवर्धने आणि युनूस खान यांनी कसोटीत प्रत्येकी 34 शतके केली आहेत. कसोटीत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 200 कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक 51 शतके झळकावली आहेत.
रूट मालिकेत 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत
जो रूट हा श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 3 डावात 200 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतकांची नोंद आहे. सध्याच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडच्या खेळाडूंचे वर्चस्व आहे. इंग्लंडचे फलंदाज अव्वल 2 मध्ये विराजमान आहेत. जेमी स्मिथ 3 डावात 171 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवली जात आहे. रूट हा जागतिक कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 15 सामन्यात 1200 हून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल दुसऱ्या स्थानावर आहे. यशस्वीने 9 सामन्यात 1028 धावा केल्या आहेत.
हेही वाचा –
रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्येच कायम राहणार? MI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
आयपीएल 2024 ला मिळाली विक्रमी लोकप्रियता! जिओ सिनेमानं मोडले पूर्वीचे सर्व रेकॉर्ड
फिंच-गुप्टिलपासून आरपी सिंग दिलशानपर्यंत; लिजेंड्स लीगमध्ये हे दिग्गज खेळाडू राहिले अनसोल्ड