इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सोपा विजय मिळवला. शनिवारी (९ जुलै) बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियममध्ये उभय संघातील दुसरा टी-२० सामना खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलच्या मते रिषभ पंत या सामन्यात इशान किशनऐवजी डावाची सुरुवात करू शकतो.
असे मानले जात आहे की, एजबस्टनमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० सामन्यात इशान किशन (Ishan Kishan) ऐवजी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) भारताच्या डावाची सुरुवात करू शकतो. भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल (Parthiv Patel) यानेही पंत सलामीसाठी उतरेल, असे सांगितले आहे. तसेच मध्यक्रमातील श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणे कठीण दिसत असल्याचेही पार्थिवने पुढे बोलताना सांगितले. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) सध्या क्रमांक एकचा फिनिशर आहे, असेही पार्थिव पटेलला वाटते.
इशान किशन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि त्याने यावर्षी भारतीय संघासाठी सर्वात जास्त टी-२० धावा केल्या आहेत. तो म्हणाला की, रिषभ पंतसाठी आयपीएल २०२२ हंगाम भलेही चांगला गेला नाहीये, पण एजबस्टन कसोटीत पंतने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले आहे. या प्रदर्शानंतर तो जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. पार्थिव पुढे असे म्हटला की, माझ्या मते इशान किशनच्या जागी रिषभ पंत सलामी करू शकतो. तसेच वरच्या फळीत पंतला नक्कीच संधी मिळेल.
दरम्यान, रिषभ पंत आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार होता, पण त्याचे वैयक्तिक प्रदर्शन समाधानकारक नव्हते. आयपीएलनंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचेही नेतृत्व केले आणि मालिका २-२ अशा बरोबरीवर सोडवली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या कसोटी सामन्यात मात्र त्याने जोरदार पुनरागमन केले. कसोटी समन्यातील पहिल्या डावात पंतने १४६, तर दुसऱ्या डावात ५७ धावांची खेळी केली.
उभय संघातील टी-२० मालिकेचा दुसरा सामना जर भारताने जिंकला, तर संघ मालिका देखील नावावर करेल. तर दुसरीकडे इंग्लंड संघ मात्र या सामन्यात विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी२० च्या जमान्यात ५७ वर्षापासून अबाधित आहे ‘हा’ विश्वविक्रम, सेहवाग पोहोचला होता सर्वात जवळ
सगळ्यांच सतत ‘ते’ एकच कारण का?, गावस्करांनी भारतीय खेळाडूंबाबत दर्शवली चिंता
भुवनेश्वर काय बटलरची पाठ सोडना!, गेल्या दोन्ही सामन्यात दियाल ‘गोल्डन डक’