मुंबई । माजी रणजी क्रिकेटपटू जयमोहन थम्पी यांची हत्या केल्याप्रकरणी मुलगा अश्विन याला बुधवारी (१० जून) पोलिसांनी अटक केली आहे. मागील आठवड्यात थम्पी हे त्यांच्या घरात मृत अवस्थेत आढळून आले.
डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असे पोस्टमार्टम अहवालात स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मुलगा अश्विन याला आयपीसी 302 या कलमाखाली अटक केली.
64 वर्षीय थम्पी (Jayamohan Thampi) हे स्टेट बँक ऑफ त्रावणकोर येथून उपमहाप्रबंधक या पदावरून निवृत्त झाले होते. शनिवारी त्यांचे निधन झाले. मात्र, 36 तासांनंतर सोमवारी ते मृत्यू पावल्याची माहिती समोर आली. त्यांच्या घरात घरकाम करणाऱ्या महिलेने घरात प्रचंड दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती देताच ते घटनास्थळी दाखल झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, थम्पी आणि त्यांचा मुलगा हे मद्य सेवन करत होते. थम्पी यांनी आपल्या मुलाला एटीपी कार्ड मागितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. मुलगा अश्विन याने थम्पींना मारहाण केली. डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही मुलगा अश्विन तेथेच दारूच्या नशेत पडून होता. पण आपले वडील मेलेत याची जरासुद्धा त्याला कल्पना नव्हती.
सोमवारी थम्पी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अश्विन देखील उपस्थित होता. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या मुलानेच खून केल्याची पोलिसांपुढे कबुली दिली आहे. जयमोहन थम्पी हे केरळ संघाकडून 1979- 82 या दरम्यान रणजी सामने खेळले आहेत. ते यष्टीरक्षक फलंदाज होते.