आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला एक महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. 5 ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. अशात, स्पर्धेसाठी भारताचा मंगळवारी (दि. 5 सप्टेंबर) 15 सदस्यीय संघ घोषित केला जाणार आहे. मात्र, यापूर्वीच भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने आपला आवडता भारतीय संघ निवडला आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेसाठी ज्या 17 खेळाडूंची निवड केली होती, त्यामधील कोणत्या खेळाडूंना गंभीरने आपल्या ताफ्यात सामील केले नाही, चला तर जाणून घेऊयात…
गौतम गंभीरने वनडे विश्वचषकासाठी निवडला भारतीय संघ
भारतीय संघाचा दिग्गज माजी सलामीवीर गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ (Team India For World Cup 2023) निवडला. त्याने यादरम्यान संघात अशा एका खेळाडूला स्थान दिले, ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
गंभीरने निवडलेल्या भारतीय संघात फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर याला जागा दिली आहे. चकित करणारी बाब म्हणजे, हा खेळाडू आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेसाठी भारतीय संघात सामील नव्हता. तसेच, गंभीरने श्रेयस अय्यर, तिलक वर्मा आणि शार्दुल ठाकूर यांनाही आपल्या संघात जागा दिली नाहीये. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांना आशिया चषकासाठी संघात निवडले गेले होते. मात्र, असे म्हटले जात आहे की, या दोन्ही खेळाडूंनी वनडे विश्वचषकासाठी संघात जागा मिळणार नाही.
याव्यतिरिक्त गंभीरने आपल्या संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा या 4 वेगवान गोलंदाजांना जागा दिली आहे. तसेच, रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनाही संघात ठेवले आहे.
चहल- अश्विनही बाहेर
आशिया चषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात युझवेंद्र चहल आणि आर अश्विन यांचा समावेश केला नव्हता. यानंतर संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, गंभीरने वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या आपल्या संघातून चहल आणि अश्विनलाही बाहेरचा रस्ता दाखवला.
गंभीरने विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, रवींद्र जड़ेजा, वाशिंगटन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी. (former opener gautam gambhir picks india squad for odi world cup 2023 no place for this star cricketers)
महत्त्वाच्या बातम्या-
विश्वचषक 2023 पूर्वी सर्वात मोठी गुड न्यूज! दिग्गज केन विलियम्सन फूल फिट
सुपर फोरमध्ये भारताची दिमाखात एन्ट्री! नेपाळला नमवल्यानंतर पाकिस्तानशी करणार दोन हात