आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy) पाकिस्तानमध्य़े खेळली जाणार आहे. पण त्यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही. हे आयसीसीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भारत-पाकिस्तान संघातील माजी खेळाडू वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. तसेच आता माजी यष्टिरक्षक-फलंदाज रशीद लतीफने (Rashid Latif) म्हटले की, जर माझ्याकडे सत्ता असती, तर मी पाकिस्तानला भारताविरूद्ध कोणत्याही स्पर्धेत खेळू दिले नसते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला आहे आणि अशी अटकळ आहे की संपूर्ण स्पर्धा देशाबाहेर आयोजित केली जाऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (ICC) पत्र लिहून बीसीसीआयकडून लिखित पुष्टी मागितली आहे की भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाण्यास असमर्थ आहे.
रशिद लतीफने (Rashid Latif) पीटीआयशी बोलताना सांगितले की, “पाकिस्तान भारताविरूद्ध क्रिकेट खेळणे थांबवण्याची शक्यता आहे. जर माझ्याकडे सत्ता असती तर होय, मी कदाचित हे कठोर पाऊल उचलले असते. यासाठी मी कोणालाही दोष देणार नाही. जर तुम्हाला पाकिस्तानमध्ये खेळायचे नसेल तर आमच्याविरूद्ध अजिबात खेळू नका.” मी आयसीसीमध्ये असतो तर हा निर्णय घेतला असता आणि बीसीसीआयच्या विरोधात लढलो असतो.”
पुढे बोलताना लतीफ म्हणाला, “माझ्या दृष्टिकोनातून, दोन्ही संघातील समस्यांचे निराकरण होईपर्यंत आयसीसीने दोन्ही देशांचे यजमान हक्क रोखून ठेवले पाहिजेत.” देशातील खेळाच्या प्रशासनात राजकीय हस्तक्षेप केल्याप्रकरणी आयसीसीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये श्रीलंका क्रिकेट (SLC) ला निलंबित केले होते. या वर्षी जानेवारीत ही स्थगिती उठवण्यात आली होती. याबद्दल लतीफ म्हणाला, “भारत आणि पाकिस्तानवर हे नियम का लागू केले जात नाहीत? कारण त्यांच्यावर आयसीसीचे बरेच काही पणाला लागले आहे.”
लतीफ म्हणाला, “मी म्हणेन की बीसीसीआयची चूक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ते जे कारण देत आहेत ते अतिशय कमकुवत आहे. बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेट संघाला धोका वाटत असल्याचे लिखित स्वरूपात असावे. आयसीसीच्या सुरक्षा पथकाने येथे येऊन स्पर्धेला हिरवी झेंडी दिली. तुम्हाला काही अडचण आली असती तर तुम्ही त्यांना सांगू शकला असता. कोणीही ते लिखित स्वरूपात पाहिलेले नाही. हे कागदाच्या तुकड्यावर लिहावे लागेल. आम्ही पीसीबीशी बोललो असून त्यांनी यासंदर्भात पाकिस्तान सरकारला ईमेल पाठवल्याचे सांगितले आहे. हा गंभीर कायदेशीर प्रश्न आहे, तो लेखी देण्यास कोणी तयार नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्या (टाॅप-5) संघ
पाकिस्तानबाहेर खेळली जाऊ शकते चॅम्पियन्स ट्रॉफी? आयसीसी लागली तयारीला!
गुजरात टायटन्सचा मोठा निर्णय! तीन वेळच्या आयपीएल विजेत्याला सहाय्यक कोच म्हणून नियुक्त केले