पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या खराब कामगिरी करताना दिसत आहे. २०२०-२१ मध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा दौरा केला होता. या दौऱ्यातील टी२० आणि कसोटी मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीज राजा यांनी संघाच्या पराभवासाठी मुख्य प्रशिक्षक मिस्बाह-उल-हक यांना जबाबदार धरले आहे आणि त्यांची तुलना भारतीय दिग्गज एमएस धोनी याच्यासोबत केली आहे.
क्रिकेजबाज यूट्यूब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत रमीज म्हणाले की, “मिस्बाहची ट्रेनिंग एका वेगळ्या वातावरणात झाली आहे. त्यांना गरिबांचा धोनी म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण धोनी शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. मिस्बाहचा स्वभावही अगदी धोनीशी मिळताजुळता आहे. परंतु बदलत्या आधुनिक क्रिकेटच्या हिशोबाने मिस्बाहनी त्यांच्या स्वभावात बदल करायला पाहिजे.”
“पाकिस्तान क्रिकेट संघाला आक्रमक खेळीसाठी ओळखले जाते. मात्र मिस्बाहच्या प्रशिक्षणाखाली संघ खूप बचावात्मक क्रिकेट खेळत आहे. यामुळे खेळाडू जास्तच बचावात्मक फलंदाजी करत आहेत आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागत आहे. प्रशिक्षक मिस्बाहनी पाकिस्तान संघात जीपीएस सेट करायला हवा. त्यांनी संघाला पुन्हा आक्रमक क्रिकेट खेळायला सांगायला हवे आणि पराभवाच्या दाढेतून बाहेर काढायला हवे,” असे पुढे रमीज यांनी म्हटले.
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात १८ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत ३ सामन्यांची टी२० मालिका झाली होती. या मालिकेत न्यूझीलंडने २-१ ने पाकिस्तानचा पराभव केला होता. त्यानंतर २६ डिसेंबर ते ७ जानेवारी दरम्यान झालेल्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने पाकिस्तानला क्लीन स्वीप केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
ऐकलंत का! कॅप्टन कोहलीने २०२० मध्येच दिले होते ‘या’ धुरंधरच्या निवडीचे संकेत, स्वत:च केला खुलासा
नव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा नवा रंग, खास व्हिडिओ शेअर करत लॉन्च केली नवी जर्सी






