द ओव्हल स्टेडियम, लंडन येथे इंग्लंड विरुद्ध भारत संघांमध्ये चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा ३ दिवसांचा खेळ झाला असून तिसऱ्या दिवसाखेर भारतीय संघ इंग्लंडपेक्षा १७१ धावांनी आघाडीवर आहे. अजून या सामन्याच्या २ दिवसांचा खेळ बाकी आहे. अशात रविवारी (०५ सप्टेंबर) मोठे वृत्त पुढे आले आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली आहे. बीसीसीआयने याची माहिती दिली आहे.
शनिवारी संध्याकाळी त्यांची नियमित चाचणी केली गेली. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. मात्र अद्याप त्यांच्या आरटी पीसीआर चाचणीचा अहवाल आलेला नाही. असे असले तरीही, शास्त्रींसहित त्यांचे सहकारी भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओ नितिन पटेल यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शास्त्रींच्या संपर्कात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना विगलीकरणात ठेवण्यात आले आहे.
त्यांचीही आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली असून मेडिकल टीमने सूचना दिल्याशिवाय ते संघाच्या हॉटेलमध्ये परतू शकणार नाहीत, असेही बीसीसीआयने सांगितले आहे.
भारतीय संघातील इतर सदस्यांच्याही शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी, अशा २ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमध्ये निगेटिव्ह येणारे सदस्यच चौथ्या दिवशीच्या खेळासाठी भारतीय संघासोबत जोडले जातील.
असे असले तरीही, इंग्लंड आणि भारत यांच्यातील चौथ्या सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळावर याचा कसलाही परिणाम होणार नाही. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अष्टपैलू रविंद्र जडेजा खेळासाठी मैदानावर उतरले आहेत. कोहलीने २२ धावा आणि जडेजाने ९ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आहे. भारतीय संघाकडे सध्या १७१ धावांची आघाडी आहे. अजून भारताच्या हातात ७ विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘वैयक्तिक कटुतेमुळे अश्विनला संघात स्थान दिले नाही’, कर्णधार कोहलीवर विरोधी संघातून जहरी टीका
ओव्हलमध्ये ६१ धावांची उपयुक्त खेळी करुनही पुजारा नाखुश; म्हणाला, ‘पुढच्या सामन्यात शतक ठोकणार’
‘कसोटी संघातील स्थान टिकवून ठेवण्याची हीच शेवटची संधी होती’, शतकवीर रोहितचे गंभीर विधान