वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात शुक्रवारी (२२ जुलै) वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे. हा सामना त्रिनिदादच्या पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळवला जाणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रिषभ पंत या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ या मालिकेत सहभागी होईल. दोन्ही संघ या सामन्यासाठी तयार आहेत.भारताचा उपकर्णधार व अष्टपैलू रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्याने तो पहिल्या सामन्यातून बाहेर झाला असून, मालिकेतही खेळणार की नाही याबाबत शंका आहे. त्याचवेळी वेस्टइंडीज आणि भारत यांच्या दरम्यान आजवर झालेल्या वनडे सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी कोणत्या भारतीय गोलंदाजांनी मिळवले याची माहिती आपण घेणार आहोत.
१) कपिल देव-
कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळी घेणारे आणि ५००० धावा करणारे एकमेव क्रिकेटपटू म्हणून माजी भारतीय कर्णधार कपिल देव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले. वनडे क्रिकेटमधील त्यांची कामगिरी ही अप्रतिम होती. २२५ वनडे सामन्यांमध्ये त्यांनी ३७८३ धावा केल्या आणि २७.४ च्या सरासरीने २५३ बळी घेतले.
कपिल देव यांनी वनडे क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कोणत्याही भारतीय गोलंदाजापेक्षा अधिक बळी घेतले आहेत. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ४२ वनडे सामने खेळत २८.८८ च्या सरासरीने ४३ बळी मिळवले.
२) अनिल कुंबळे-
वनडे क्रिकेटमध्ये अनिल कुंबळे भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. २६९ वनडे सामन्यांमध्ये अनिल कुंबळेने ३०.८३ च्या सरासरीने ३३४ बळी घेतले आहेत. त्याची वेस्ट इंडिजविरुद्धची कामगिरी देखील उल्लेखनीय आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध २६ वनडे सामने खेळले आणि २३.७३ च्या सरासरीने ४१ बळी मिळवले.
३) रवींद्र जडेजा-
सदर मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार असलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा हादेखील वेस्ट इंडीज विरुद्ध नेहमीच चमकतो. त्याने आतापर्यंत वेस्ट इंडीज विरुद्ध २९ वनडे खेळताना २९.७० च्या सरासरीने ४१ बळी मिळवले आहेत. आणखी दोन बळी मिळवत तो वेस्ट इंडीजविरुद्ध वनडेत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनू शकतो.
४) मोहम्मद शमी-
सध्या भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणारा मोहम्मद शमी हा देखील या यादीत सामील आहे. त्याने आजवर वेस्ट इंडिजविरुद्ध १८ सामन्यात ३७ बळी आपल्या नावे केले आहेत. परंतु या मालिकेत तो खेळत नसल्याने त्याची बळींची संख्या आणखी वाढणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
INDvWI: ‘गुरु’ द्रविड यांचा मास्टर स्ट्रोक! नेटमध्ये चक्क लोकल गोलंदाजाकडून करून घेतली गोलंदाजी
बीसीसीआयचे ८६.२१ कोटी देण्यास बायजूसचा नकार?, पेटीएमही सोडणार स्पॉन्सरशिप, वाचा संपूर्ण प्रकरण