भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. पुढील महिन्यात होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर तो आपले पद सोडेल. त्याने एक सोशल मीडिया पोस्ट करत सर्वांना याबाबत माहिती दिली. मात्र, विराट ज्या चार कारणांमुळे हे कर्णधारपद सोडण्यास बाध्य झाला, त्याबाबत आपण जाणून घेऊया.
१) आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात अपयश
विराट २०१७ पासून भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित कर्णधार आहे. याकाळात भारताने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत तसेच, २०१९ वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र, या दोन्ही वेळी तो संघाला विजयी बनवू शकला नाही. तसेच, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत देखील भारताला पराभव पत्करावा लागला.
२) फलंदाजीतील खराब फॉर्म
जगातील क्रमांक एकचा फलंदाज असला तरी विराट सध्या मोठ्या धावसंख्या बनण्यापासून वंचित राहत आहे. नोव्हेंबर २०१९ पासून तो आंतरराष्ट्रीय शतक झळकावू शकला नाही. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयात त्याचे फलंदाज म्हणून योगदान तितकेसे मिळेना. याचाच परिणाम त्याच्या नेतृत्वावर देखील होत होता.
३) रोहितकडून मिळतेय कडवी टक्कर
कर्णधार म्हणून विराट कोहलीला संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याच्याकडून कडवी टक्कर मिळत आहे. विराटच्या खात्यावर कर्णधार या नात्याने आंतरराष्ट्रीय तसेच आयपीएलचे कोणतेही विजेतेपद नाही. दुसरीकडे, रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाच्या जोरावर मुंबई इंडियन्सला तब्बल पाच वेळा आयपीएल जिंकून दिली आहे. तसेच, रोहितच्या नेतृत्वात भारताने आशिया चषक जिंकला होता.
४) दबाव कमी करण्यासाठी घेतला असू शकतो निर्णय
विराट कोहलीच्या या निर्णयाचे एक कारण असेही आहे की, भविष्यात त्याला वनडे आणि कसोटी संघाचे कर्णधारपदावर लक्ष केंद्रित करता येऊ शकते. टी२० संघाचे नेतृत्व सोडून त्याने कर्णधारपदाचा लोभ नसल्याचे दाखवून दिले. जर भारताने ऑक्टोबरमध्ये टी२० विश्वचषक जिंकला, तर विराटच्या कर्णधारपदाला चारचांद लागतील. विराट कमीतकमी २०२३ वनडे विश्वचषकापर्यंत वनडे आणि कसोटी स्वरूपांमध्ये भारताचा कर्णधार राहण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताची पुढील पिढी घडवणार ‘लेफ्टनंट कर्नल धोनी’, संरक्षण मंत्रालयाने दिली ‘ही’ जबाबदारी
विराट कोहली देणार टी२० कर्णधारपदाचा राजीनामा, भावनिक पोस्टसह केली घोषणा
टी२० विश्वचषकाआधी विराटसमोर चार मोठे यक्षप्रश्न, शोधावी लागतील उत्तरे