---Advertisement---

फ्रेंच ओपन: ग्रीसच्या त्सित्सिपासने घडवला इतिहास; पहिल्यांदा ग्रँडस्लॅमच्या फायनलमध्ये केला प्रवेश

---Advertisement---

पॅरीस। फ्रेंच ओपन २०२१ स्पर्धेत शुक्रवारी पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीतील सामने पार पडले. या फेरीतील पहिला सामना ग्रीसच्या स्टिफानोस त्सित्सिपास विरुद्ध जर्मनीच्या ऍलेक्झांडर झ्वेरेवमध्ये रंगला ५ व्या सेटपर्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात ५ व्या मानांकित त्सित्सिपासने बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला.

त्सित्सिपास त्याच्या कारकिर्दीतील ग्रँडस्लॅम स्पर्धांमधील चौथा उपांत्य फेरीचा सामना खेळत होता. पण त्याला या विजयासह कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करता आला आहे. तसेच तो ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरी गटात अंतिम सामन्यात प्रवेश मिळवणारा पहिलाच ग्रीसचा टेनिसपटू ठरला आहे.

तब्बल ३ तास ३७ मिनिटे चाललेल्या उपांत्य सामन्यात त्सित्सिपासने सहाव्या मानांकित झ्वेरेवला ६-३, ६-३, ४-६, ४-६,६-३ अशा फरकाने ५ सेटमध्ये पराभूत केले.

त्सित्सिपासने या सामन्याची सुरुवात पहिल्या ११ मिनिटात ३ गेम जिंकत दमदार केली होती. पण नंतर हळूहळू झ्वेरेवनेही त्याचा खेळ उंचावत नेला. पण त्सित्सिपासने पहिल्या सेटमध्ये घेतलेल्या आघाडीला न गमावता हा सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये झ्वेरेवने सुरुवात शानदार केली. त्याने पहिले ३ गेम जिंकत आघाडी मिळवली होती. पण ही आघाडी टिकवणे त्याला जमले नाही. त्सित्सिपासने सगल ६ गेम जिंकत दुसरा सेट आपल्या नावावर केला.

पण तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये झ्वेरेवने आपल्या खेळाची लय बिघडू दिली नाही. त्याने हे दोन्ही सेट जिंकत सामन्यात पुनरागमन केले आणि सामना निर्णायक ५ व्या सेटमध्ये नेला. पण ५ व्या सेटमध्ये त्सित्सिपासने झ्वेरेवची सर्विस भेदत आघाडी मिळवली. ही आघाडी त्याने गमावली नाही आणि अखेर हा सेट ६-३ फरकाने जिंकत सामना खिशात घातला.

सामना संपल्यानंतर २२ वर्षीय त्सित्सिपास भावूक झाला होता. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, ‘मी आता जिथून आलो आहे, त्याचाच विचार करत आहे. मी अथेन्सबाहेरच्या एका छोट्या भागातून आलो आहे. माझे इथे खेळण्याचे स्वप्न होते आणि मी कधीही विचार केला नव्हता की मी हे यश मिळवेल.’

त्सित्सिपास (२२ वर्षे आणि ३०५ दिवस) हा फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश करणारा २००८ नंतरचा सर्वात युवा टेनिसपटू आहे. २००८ साली राफेल नदालने २२ वर्षे ५ दिवस वय असताना फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

अंतिम सामन्यात त्सित्सिपासचा सामना अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच विरुद्ध रविवारी (१३ जून) होणार आहे. जोकोविचने १३ वेळच्या फ्रेंच ओपन विजेत्या राफेल नदालला पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

तसेच शुक्रवारी मिळवलेल्या विजयामुळे त्सित्सिपास जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर येणार आहे. ही त्याची कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी असेल.

वाचा –  फ्रेंच ओपनचा ‘तराजू’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---