येत्या ९ जूनपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतून यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक तब्बल ३ वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन करत आहे. विशेष गोष्ट अशी की, १६ वर्षांनंतरही कार्तिक भारतीय संघाकडून टी२० क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
पहिल्या टी२० सामन्यात खेळलेला एकमेव खेळाडू
कार्तिकला जर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी२० मालिकेत (T20 Series) अंतिम ११ जणांमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर तो सध्याच्या संघातील एकमेव खेळाडू असेल, जो भारताकडून सर्वात पहिला टी२० सामना देखील खेळला आहे. भारताने १ डिसेंबर २००६ रोजी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच इतिहासातील आपला पहिला टी२० सामना (India’s First T20 Match) खेळला होता. त्या सामन्यात भारताकडून दिनेश कार्तिकही (Dinesh Karthik) खेळलेला.
त्यावेळी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात कार्तिकव्यतिरिक्त विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, दिनेश मोंगिया, एमएस धोनी, सुरेश रैना, इरफान पठाण, हरभजन सिंग, झहिर खान, अजित अगरकर आणि श्रीसंत हे खेळाडू होते. यातील कार्तिक सोडला, अन्य सर्वांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. म्हणजे तब्बल १६ वर्षांनंतर देखील कार्तिक भारतीय संघाचा भाग झाला आहे.
विशेष म्हणजे दिनेश कार्तिक हा भारताच्या पहिल्या टी२० सामन्यात सामनावीर देखील ठरला होता. त्याने या सामन्यात २८ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या होत्या. हा सामना भारताने ६ विकेट्सने आणि १ चेंडू राखून जिंकला होता. महत्त्वाचे म्हणजे त्या सामन्यात खेळलेल्या अनेक दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी देखील निवृत्ती घेतलेली आहे. यात एबी डिविलियर्स, एल्बी मॉर्केल, ग्रॅमी स्मिथ, हर्षल गिब्स अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
या सामन्यानंतर भारताने आत्तापर्यंत १५९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यातील १०१ सामने भारताने जिंकले आहेत आणि ५१ सामने पराभूत झाले आहेत. ३ सामन्यात बरोबरी झाली आहेत. तसेच ४ सामन्याचे निकाल लागलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
फ्रेंच ओपनच्या सेमिफायनलचा सामना थांबला काही काळासाठी, जाणून घ्या कारण
आरसीबीने नाही दिला चान्स, पण इंग्लंडच्या टी२० लीगमध्ये गाजलाय ‘हा’ खेळाडू
टी२० विश्वचषकात कोणता खेळाडू घेईल धोनीची जागा, शास्त्रींनी घेतले ‘या’ खेळाडूचे नाव