ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर शुबमन गिलच्या युवा नेतृत्वाखालील टीम इंडियाने इंग्लंडसमोर चांगली टक्कर दिली. मात्र 22 धावांनी झालेल्या पराभवामुळे भारताला तिसऱ्या कसोटीत पराभव स्वीकारावा लागला. या पराभवाने इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असून भारतावर मालिका गमावण्याचे संकट गडद झाले आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कसोटी कोचिंग कार्यकाळावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताने आतापर्यंत 13 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ 4 सामने जिंकले असून 8 सामन्यांत पराभव, तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध 0-3 ने मालिका गमावणे हे 12 वर्षांतील पहिलेच असे प्रकरण होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 1-3 ने गमावली. सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावर भारताने पहिला सामना लीड्समध्ये गमावला, दुसऱ्या सामन्यात एजबॅस्टनमध्ये जोरदार पुनरागमन करत 1- 1 अशी बरोबरी साधली, पण तिसऱ्या सामन्यात लॉर्ड्सवर पुन्हा पराभव झाला.
भारत जर ही मालिका गमावतो, तर बीसीसीआय गौतम गंभीरच्या भवितव्याचा पुन्हा विचार करू शकते, असे चर्चेत आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गंभीरने काही महत्त्वाच्या कामगिरी करून दाखवल्या असल्या तरी कसोटी क्रिकेटमधील सातत्याने होणारे अपयश आता डोळ्यासमोर येत आहे.
भारत आता चाैथा कसोटी सामना 23 जुलैपासून मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळणार आहे. त्यानंतर शेवटचा आणि निर्णायक पाचवा सामना 31 जुलैपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. भारताला मालिका जिंकायची असेल, तर दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. तर, मालिका बरोबरीत राखण्यासाठी किमान एक सामना जिंकून एक अनिर्णित ठेवावा लागेल.






