Gautam Gambhir BCCI Team India head coach: टी20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला असून त्यांच्याजागी माजी भारतीय क्रिकेटपटू व गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची निवड केली गेली आहे. गंभीरच्या प्रशिक्षणाखाली 27 जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेत वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. मात्र अद्याप गंभीरच्या सपोर्ट स्टाफची (Team India Support Staff) घोषणा झालेली नाही. आतापर्यंतच्या घडामोडींवरुन सपोर्ट स्टाफबाबत गंभीर आणि बीसीसीआयची आवडनिवड जुळत नसल्याचे चित्र आहे.
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी गंभीरची निवड होण्यापूर्वी त्याने बीसीसीआयकडे स्वत:च्या आवडीचा सपोर्ट स्टाफ आणि संघ निवडीचे सर्वाधिकार हवे असल्याची अट ठेवली होती. परंतु सुरुवातीला हो हो म्हणणाऱ्या बीसीसीआयने गंभीरने सुचवलेल्या 5 नावांवर फुल्ली मारल्याचे समोर येत आहे.
गंभीरला दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलचा सपोर्ट स्टाफमध्ये समावेश करायचा होता. तो मॉर्केलला त्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यातही गंभीर अपयशी ठरला. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने गंभीरचा हा प्रस्ताव फेटाळला आहे. मॉर्केलपूर्वी गंभीरने विनय कुमार आणि लक्ष्मीपती बालाजी यांची नावे सुचवली होती. परंतु बोर्डाकडून या नावांनाही मान्यता देण्यात आली नाही.
गोलंदाजी प्रशिक्षक हा एकमेव विषय नाही ज्यात बोर्डाने गंभीरच्या शिफारसी नाकारल्या आहेत. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून गंभीरच्या निवडीची दोन नावेही नाकारण्यात आली आहेत. गंभीरने क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी नेदरलँडचा रायन टेन डोशेट आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये एकत्र काम केलेले दक्षिण आफ्रिकेचे जॉन्टी रोड्स यांची नावे सुचवली होती, परंतु बोर्डाने त्यास नकार दिला.
गंभीरच्या प्राधान्यांपैकी, केवळ माजी भारतीय अष्टपैलू अभिषेक नायर त्याच्या सहाय्यक प्रशिक्षक किंवा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. असे असले तरीही, अद्याप बीसीसीआयने नायरच्या नावावर अधिकृतपणे मोहर लावलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधारपद तर फक्त ट्रेलर, पाहा पुढे आणखी काय काय होणार.., गौतम गंभीरने 2023 मध्येच दिलेला इशारा
रोहितला ऐकावा लागला प्रशिक्षक गंभीरचा आदेश! वनडे मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता
श्रीलंका दौऱ्याआधीच भारत-पाकिस्तान आमने-सामने…! पाहा कधी होणार सामना?