न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका भारताने ३-० अशा फरकाने जिंकली. यानंतर २५ नोव्हेंबरपासून उभय संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जाईल. कसोटी मालिकेत भारताचे अनेक वरिष्ठ खेळाडू विश्रांतीवर आहेत. अशात संघ युवा खेळाडूंसोबत न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाचा सामना करणार आहे. अशात पहिल्या कसोटी सामन्यात वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाचा फलंदाजी क्रम कसा असेल, याविषयी गौतम गंभीरने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.
गंभीर स्टार स्पोर्ट्सशी बोलत होता. यावेळी तो म्हणाला की, रोहित शर्माच्या गैरहजेरीत मयंक अगरवालने गिलसोबत डावाची सुरुवात केली पाहिजे. गंभीरच्या मते मयंकने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात डावाची सुरुवात केली आहे. तो म्हणाला की, हे पाहून चांगले वाटते की अजिंक्य रहाणे सध्या संघात आहे आणि पहिल्या सामन्यात नेतृत्व करत आहे. ज्याप्रकारे त्याने इंग्लंडमध्ये प्रदर्शन केले, शक्यतो ते पाहूनच त्याला संघाचा कर्णधार केले गेले आहे.
यावेळी इरफान पठाणने देखील उपस्थित होता. तो म्हणाला की, “अजिंक्य रहाणेच्या प्रदर्शनावर नजर ठेवावी लागेल. कारण तो मोठ्या काळापासून काही खास प्रदर्शन करू शकला नाहीये. रहाणेसाठी मागचे एक वर्ष अजिबातच चांगले नाही राहिले. अशात फक्त न्यूझीलंड नाही तर भारतीय संघालाही पाहावे लागणार आहे की, दक्षिण अफ्रिकेत मधल्या षटकांमध्ये कोण फलंदाजी करेल, जर शुभमन गिल मध्यक्रमात फलंदाजी करू शकतो, तर त्याला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत मध्यक्रमातच फलंदाजी करण्याची संधी दिली पाहिजे.”
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांतील दिली गेली आहे. विराट कोहलीला टी२० मालिकेसह पहिल्या कसोटीतही विश्रांती दिली गेली. नवीन टी२० कर्णधार रोहित शर्माने टी२० मालिकेत संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर त्याला कसोटी मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. तसेच कसोटी मालिकेपूर्वी सलामीवीर केएल राहुल देखील दुखापतग्रस्त झाला आहे. दुखापतीमुळे राहुलला संपूर्ण कसोटी मालिकेत विश्रांती दिली गेली. राहुलच्या जागी सूर्यकुमार यादवला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.