भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलच्या फलंदाजीचे कौतुक केले आहे. राहुलने आयपीएल २०२१ मध्ये ६०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मात्र, त्याचा संघ प्लेऑफसाठी पात्र होऊ शकला नाही. पंजाबने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. पण नंतर झालेल्या अन्य संघांच्या सामन्यांनी त्यांचे प्लेऑफचे स्वप्न भंगले. या सामन्यात राहुलने ९८ धावांची तुफानी खेळी केली होती. सध्या तो आयपीएल २०२१ हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
सीएसकेविरुद्ध राहुलची शानदार खेळी पाहून गंभीरने पंजाबच्या कर्णधाराची खूप प्रशंसा केली आहे. गौतम म्हणाला की, राहुलकडे भारताच्या इतर फलंदाजांपेक्षा वेगवेगळ्या शॉट्सचा मोठा साठा आहे.
गंभीरने म्हणाला, ‘त्याच्याकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीपेक्षा जास्त क्षमता आहे. फक्त चेन्नईविरुद्धची फलंदाजी पाहून मी हे बोलत नाही. खरंच त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. भारताच्या कोणत्याही फलंदाजापेक्षा त्याच्याकडे विविध शॉट्स खेळण्याची कला आहे. त्याने हे पुन्हा पुन्हा सिद्ध केले आहे.’
राहुल दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये पंजाबचा कर्णधार होता. आयपीएलच्या सध्याच्या मोसमात त्याने १४ सामन्यांमध्ये ६२४ धावा केल्या आहेत. ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारा तो या हंगामातील सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. त्याने या हंगामात ६ अर्धशतके केली आहेत. त्यात त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ९८ अशी होती.
गंभीर पुढे म्हणाला, ‘जर राहुल असेच खेळत राहिला, तर येत्या काळात संपूर्ण जग त्याच्याबद्दल बोलेल. राहुलने असेच आपले क्रिकेट खेळावे. त्याने आपला आक्रमक खेळ केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात दाखवावा. आज संपूर्ण जग विराट कोहली आणि रोहित शर्माला त्यांच्या शानदार खेळासाठी ओळखते. येत्या काळात जर राहुल असेच खेळत राहिला, तर जगभरातील लोक त्याच्याबद्दल यापेक्षा जास्त बोलतील. याचे कारण असे की त्याच्याकडे भारताच्या इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा मैदानाभोवती चौफेर फटके मारण्याची अधिक क्षमता आहे.’
पंजाब किंग्सने चालू आयपीएल हंगामात एकूण १४ सामने खेळले, त्यापैकी ६ सामने जिंकले आणि ८ सामने गमावले. पंजाब १२ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सने ‘या’ तीन खेळाडूंना आयपीएल २०२२ साठी करावे संघात कायम, सेहवागने व्यक्त केले मत
आयपीएल २०२१ मधील प्रवास संपल्यानंतर आता रोहित शर्मा-केएल राहुलसह भारतीय खेळाडू या ठिकाणी येणार एकत्र