भारतीय संघानं झिब्वाब्वेविरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 4-1 विजय मिळवला आणि मालिका आपल्या खिशात घातली. शेवटच्या सामन्यात भारतानं 42 धावांनी झिम्बाब्वे संघाला धूळ चारली. युवा कर्णधार शुबमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली भारतानं उत्कृष्ट कामगिरी केली. यानंतर भारत आता श्रीलंकेसोबत 3 टी20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामध्ये गंभीर भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे.
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. भारतासाठी श्रीलंकेविरुद्ध टी20 आणि एकदिवसीय मालिका ही खूप रोमांचक ठरु शकते. भारताचा नवीन प्रशिक्षक गौतम गंभीर या मालिकेत त्याच्या प्रशिक्षकाच्या कारकिर्दीची सुरुवात करणार आहे. जून महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं टी20 विश्वचषक जिंकला. यानंतर राहुल द्रविड यांचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला. त्यानंतर बीसीसीआयनं गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.
भारत आणि श्रीलंका दौऱ्याची सुरुवात 27 जूलैपासून होणार आहे. या दौऱ्यावर 6 सामने खेळले जाणार आहेत. प्रथम भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्यामध्ये पहिला टी20 सामना (27 जुलै), तर दुसरा 28 आणि तिसरा टी20 सामना (30 जुलै) रोजी खेळला जाणार आहे. हे सर्व सामने पल्लेकेलमध्ये भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळले जाणार आहेत.
त्यानंतर भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना (2 ऑगस्ट), दुसरा एकदिवसीय (4 ऑगस्ट) आणि तिसरा एकदिवसीय सामना (7 ऑगस्ट) रोजी खेळला जाणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमध्ये खेळले जाणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता या सामन्यांची सुरुवात होणार आहे.
श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झाली नाही. टी20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा कर्णधार कोण असेल? हेसुद्धा अजून स्पष्ट झालं नाही. पीटीआयच्या रिपोर्टनुसार रोहित शर्मा या दौऱ्यावर खेळताना दिसणार नाही. रोहितनं टी20 विश्वचषकानंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर एकदिवसीय सामन्यासाठी तो उपलब्ध नसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘माफी मागा…’, युवराज-हरभजन-रैनाला भारी पडू शकतो हा विचित्र डान्स; पॅरालिम्पिक समितीचा आक्षेप
पाकिस्तानची विचित्र मागणी, चॅम्पियन्स ट्रॉफी बाबत भारताकडून लेखी उत्तर मागितलं; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या ‘या’ माजी खेळाडूचं झालं निधन