गेल्या काही वर्षांपासून अनोख्या शैलीनं कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या इंग्लंडला पाकिस्तानकडून दारुण पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंडनं पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शानदारपणे जिंकला होता. परंतु त्यानंतर ते पाकिस्तानच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले आणि पुढच्या दोन कसोटीत त्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. इंग्लंडच्या या दारूण पराभवानंतर माजी इंग्लिश खेळाडू जेफ्री बॉयकॉट खूप संतापले आहेत.
इंग्लंडच्या या दिग्गजानं बेन स्टोक्सच्या संघावर जोरदार हल्ला चढवत त्यांना अक्कल नसलेली टीम म्हटलं आहे. इंग्लंडचा संघ फिरकी खेळण्यात पूर्णपणे असमर्थ आहे. ते आपल्या चुकांमधून शिकण्याऐवजी सपाट खेळपट्ट्यांवर धावा करण्यातच धन्यता मानतात, असं या अनुभवी खेळाडूचं मत आहे.
बॉयकॉट यांनी टेलिग्राफमधील त्याच्या स्तंभात लिहिलं, “जर तुम्हाला एक महान फलंदाज म्हणून ओळख हवी असेल, तर तुमच्याकडे संतुलित खेळ असायला हवा. तुम्हाला सर्व प्रकारच्या खेळपट्ट्यांवर धावा कराव्या लागतील. जर तुम्हाला एक महान संघ म्हणून वारसा कायम करायचा असेल, तुम्हाला सर्व खेळपट्ट्यांवर जिंकावं लागेल. ते (इंग्लंडचे फलंदाज) त्यांच्या संधी वाया घालवत आहेत. जर त्यांनी परिस्थितीनुसार काही मॅनेज केलं नाही, तर त्यांना केवळ ‘फ्लॅट ट्रॅक बुली’ म्हणून लक्षात ठेवलं जाईल.”
इंग्लंडच्या या दिग्गजानं पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या 2 कसोटी सामन्यांमध्ये काही फलंदाजांच्या कामगिरीबद्दल निराशा व्यक्त केली. बेन स्टोक्ससह इतर फलंदाजांकडे फिरकी गोलंदाजी खेळण्याचं कोणतंही तंत्र नाही, असं बॉयकॉट यांचं मत आहे. त्यांनी पुढे लिहिलं, “चेंडू वळायला लागल्यास जॅक क्रॉली, ऑली पोप, हॅरी ब्रूक आणि स्टोक्स असहाय्य होतात. ते चेंडूला मारण्यासाठी बॅट कठोर हातानं पकडतात, ज्यामुळे बॅट आणि पॅडमध्ये अंतर राहतं. जर ते चौकार-षटकार मारू शकत नसले, तर ते त्यांचा संयम गमावतात. टर्निंग पिचवर संयम आणि एकाग्रता हे सर्वात महत्वाचे गुण आहेत.”
हेही वाचा –
“विराट कोहलीनं देशांतर्गत क्रिकेट खेळावं”, कामगिरी सुधारण्यासाठी जवळच्या मित्राचा सल्ला
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गंभीर कोच नसणार, या माजी खेळाडूला मिळाली टीम इंडियाची जबाबदारी
कोच गॅरी कर्स्टनचं पाकिस्तान संघाशी बिनसलं, लवकरच सोडणार साथ