---Advertisement---

६ फूट ८ इंच उंची असणारा जेमिसन म्हणतो, ‘विराटला आऊट करणे माझ्यासाठी….’

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2020 6:45 PM
---Advertisement---

कालपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्यातून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने कसोटीत पदार्पण केले आहे. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच शानदार कामगिरी केली आहे.

जेमिसनने पहिल्या दिवसाखेर 14 षटके गोलंदाजी करताना 38 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यात चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि हनुमा विहारी या भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. तर, आज त्याने 2 षटकात केवळ 1 धाव देत इशांत शर्माला झेलबाद केले.

पदार्पणाच्या सामन्यातच विराट आणि पुजाराची विकेट घेणे हे जेमिसनसाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हते. तसेच त्याचे असे म्हणणे आहे की, गेले काही आठवडे त्याच्यासाठी एका स्वप्नाप्रमाणे होते.

6 फूट 8 इंच उंची असणारा जेमिसन म्हणाला की, “मागील काही आठवडे माझ्यासाठी स्वप्नांसारखे होते. मी स्वत:साठी आणि माझ्या संघासाठी खूप खूश आहे. विराट हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि तो संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. मला या गोष्टीवर विश्वास बसत नाही. पण, विराटची विकेट घेणे ही खूप मोठी कामगिरी होती. याबरोबर सुरुवातीलाच 2 विकेट्स घेणेही खास होते.” असेही तो यावेळी म्हणाला.

“मी साधेपणावर विश्वास ठेवतो. माझे काम फलंदाजांना खेळायला भाग पाडणे हे आहे. तसेच माझ्या अतिरिक्त उसळीच्या गोलंदाजीचा यासाठी खूप फायदा होतो. गोलंदाजीचा वेग, अतिरिक्त उसळी आणि स्विंगमुळे मला खूप मदत होत आहे. यामुळे माझे काम अधिक सोपे झाले आहे.” असेही तो यावेळी म्हणाला.

तसेच जेमिसनच्या उंचीमुळे त्याला गोलंदाजी करताना फायदा होतो. याबद्दल तो म्हणाला, “माझ्या उंचीमुळे मी फुल लेंथने चेंडू टाकू शकतो. यामुळे फलंदाजांना फ्रंटफुटवर येऊनच खेळावे लागते.” असेही तो बोलताना म्हणाला.

पहिल्या सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 71.1 षटकात 5 बाद 216 धावा केल्या आहेत. तसेच 51 धावांची आघाडी घेतली आहे. त्याआधी भारताचा पहिला डाव 165 धावांवर संपुष्टात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---