पुणे। ज्यांच्यामध्ये थोडीफार का होईना, आर्थिक मदत करण्याची क्षमता आहे, अशा सर्वांनी गरजू खेळाडूंना प्रारंभीच्या काळात आवर्जून मदत करावी, असे कळकळीचे आवाहन ऑलिम्पियन नेमबाज तेजस्विनी सावंत हिने केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंडतर्फे एरंडवणे येथील कर्नाटक हायस्कूलमध्ये शुक्रवारी (दि. २७) ‘ऑलिम्पिक वारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आकाशवाणीच्या माजी प्रसिद्ध वृत्तनिवेदिका मृदुला घोडके यांनी नेमबाजीतील रायफल थ्री पोझिशन या अवघड प्रकारातील भारताचे आशास्थान तेजस्विनी आणि टोकियो ऑलिम्पिकचे वार्तांकन करणारे क्रीडा पत्रकार आणि लेखक संजय दुधाणे यांची घेतलेली मुलाखत चांगलीच रंगली. यावेळी तेजस्विनीनेवरील मत मांडले.
तेजस्विनी पुढे म्हणाली, “खेळाडूने मोठे यश मिळवले की त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होतो. पण अनेक खेळाडूंना आर्थिक मदतीची खरी गरजही प्रारंभीच्या काळात असते. अशा वेळी केलेली छोटीशी मदत ही खेळाडूंसाठी मोठी असते. अशा गरजू खेळाडूंना मदत करून आपण खऱ्या अर्थाने देण्यातील आनंद अनुभवू शकतो. सर्व नागरिकांनी आपल्या परिसरातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. असे झाल्यास क्रीडा क्षेत्रात आपला देश आणखी वेगाने प्रगती करू शकेल.”
सलग तिसऱ्या ऑलिम्पिकचे वार्तांकन करणाऱ्या संजय दुधाणे यांच्याकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची यशोगाथा ऐकताना उपस्थित क्रीडारसिक मंत्रमुग्ध झाले होते. नीरज चोप्रा, मीराबाई चानू, पी. व्ही. सिंधू, भारतीय हॉकी संघ यांच्या कामगिरीचा ओघवता ‘आंखो देखा हाल’ दुधाणे यांच्याकडून ऐकताना उपस्थितांनी अनेकदा उत्स्फूर्तपणे टाळ्यांच्या गजरात आपल्या खेळाडूंच्या कामगिरीला दाद दिली.
“या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना पदक जिंकता आले नसले तरी तेजस्विनीसह इतर खेळाडू आगामी ऑलिम्पिकमध्ये नक्कीच पदके जिंकून आपल्या सर्वांच्या स्वप्नांची पूर्तता करतील,” असा विश्वास दुधाणे यांनी व्यक्त केला.
या वेळी गार्डीयन ग्रुपचे चेअरमन आणि ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टच्या पुणे चॅप्टरचे मनीष साबडे, रोटरी क्लब ऑफ पुणे वेस्ट एंडचे अध्यक्ष शैलेश नांदूरकर, सचिव राहुल अवस्थी, संस्थापक सदस्य प्रकाश डिंगणकर, मेजर ध्यानचंद यांच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेत्या संघातील सहकारी बाबू निमल यांचे पुत्र अजित निमल, तेजस्विनी सावंत आणि संजय दुधाणे यांचे कुटुंबीय तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. रोटरीयन नितीन वाशीकर यांनी आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या –
खूशखबर! टोकियो पॅरालिम्पिकमध्ये योगेश कथूनियाचे रुपेरी यश; भारताला मिळवून दिले पाचवे पदक
मोठी बातमी! भारताकडून ४ धावांत ६ विकेट्स घेणारा स्टुअर्ट बिन्नी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त