भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. वनडे मालिकेने दौऱ्याचा प्रारंभ होईल. उभय संघांत अनुभवी आणि दर्जेदार खेळाडू असल्याने मालिका चुरशीची होईल, अशी सर्वांना अपेक्षा आहे. याच वनडे मालिकेच्या संदर्भात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने एक विधान केले आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्माचे मर्यादित षटकांच्या मालिकांत न खेळणे, ऑस्ट्रेलियासाठी फायदेशीर ठरेल, असे मॅक्सवेलने म्हटले आहे.
रोहितचे नसणे आमच्यासाठी फायद्याचे- ग्लेन मॅक्सवेल
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेला २७ नोव्हेंबरपासून सिडनीच्या एससीजी मैदानावर सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाचा प्रमुख अष्टपैलू असलेल्या मॅक्सवेलने सोनी वाहिनीशी बोलताना म्हटले, “रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूच्या नावे तीन द्विशतके आहेत, असा खेळाडू प्रतिस्पर्धी संघात नसणे हे फायदेशीर ठरते. आमच्यासाठी ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे.”
भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित उपकर्णधार असलेला रोहित दुखापतीमुळे वनडे व टी२० मालिकांमध्ये सहभागी होणार नाही. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर तीन टी२० सामन्यांची मालिकादेखील खेळविण्यात येणार आहे.
केएल राहुल नाही भासू देणार रोहितची कमतरता
मॅक्सवेलने पुढे बोलताना, भारताचा नवा उपकर्णधार केएल राहुलचे कौतुक केले. मॅक्सवेल म्हणाला, “रोहित संघात नाही ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्याची जागा भरून काढण्यासाठी त्याच दर्जाचा केएल राहुल भारताकडे उपलब्ध आहे. आयपीएलवेळी त्याचा फॉर्म आपण सर्वांनी पाहिला होता. तो डावाची सुरुवात करो अथवा ना करो, तो ऑस्ट्रेलियात देखील यशस्वी ठरू शकतो.”
मयंक अगरवालचे केले कौतुक
ग्लेन मॅक्सवेल नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करत होता. त्या संघातील आपले सहकारी असलेले राहुल आणि मयंक अगरवाल यांची प्रशंसा करताना तो म्हणाला, “राहुल आणि मयंक दोघेही शानदार खेळाडू आहेत. ते मैदानाच्या चारही बाजूंना धावा काढू शकतात. दोघेही चुका अत्यंत कमी करतात. मात्र आम्हीदेखील पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरणार आहे.”
मॅक्सवेलसाठी आयपीएल राहिली निराशाजनक
आयपीएल २०२० मध्ये मॅक्सवेलची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली होती. तो १३ सामन्यात फक्त १०८ धावा काढू शकला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यादरम्यान तो एकही षटकार ठोकला नाही. भारताविरुद्धच्या आगामी मालिकांमध्ये मॅक्सवेल चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया-भारत मालिकेची आतुरता शिगेला! केवळ एका दिवसात संपली ‘या’ सामन्यांची तिकीटे
‘हे’ खेळाडू ठरवतील भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा निकाल, भारताच्या दिग्गजाची भविष्यवाणी
‘विराट कोहलीची विकेट महत्त्वाची’, ऑस्ट्रेलियाच्या घातक वेगवान गोलंदाजाचे मोठे वक्तव्य