ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आता आपल्या संघाचे पुन्हा नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्मिथवर २ वर्षांपूर्वी चेंडू छेडछाड प्रकरणी नेतृत्व करण्यास बंदी घातली होती. ही बंदी रविवारी (२९ मार्च) संपली आहे.
त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाल्यानंतर स्मिथला (Steve Smith) ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात येऊ शकते. परंतु क्रिकेट ऑस्ट्रेलियानेच (Cricket Australia) यावर निर्णय घेणे आवश्यक आहे.
कोरोना व्हायरसचा (Corona Virus) फटका सर्व जगाला बसला आहे. त्यामुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. या व्हायरसमुळे जवळपास जगातल्या सर्वच देशांबरोबर ऑस्ट्रेलियानेही आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे पुढील ६ महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही संघाला सामने खेळता येणार नाहीत.
स्मिथने आपला मागील सामना प्रेक्षकांविना सिडनीच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतील उर्वरित २ सामने रद्द करण्यात आले होते.
सध्या ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) आहे. त्यामुळे त्याच्या जागी स्मिथला पुन्हा कर्णधारपद सोपविण्यात येऊ शकते. परंतु स्मिथला नेमकं काय हवंय हे अजून स्पष्ट नाही. मागील वर्षी प्रशिक्षक जस्टिन लॅंगर (Justin Langer) यांनी 35 वर्षीय पेनच्या कर्णधारपदाचे कौतुक केले होते. तसेच त्याला ‘शानदार’ असेही म्हटले होते.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०१८ मध्ये चेंडू छेडछाड प्रकरणी (Ball Tampering) स्मिथवर बंदी घातली होती. यावेळी त्याने मान्य केले की त्याने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टला (Cameron Bancroft) चेंडूशी छेडछाड करण्यास सांगितले होते.
स्मिथ आणि बॅनक्रॉफ्टबरोबरच डेव्हिड वॉर्नरला (David Warner) त्याच्या उपकर्णधारपदावरून निलंबित करण्यात आले होते. त्याच वेळी बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांसाठी बंदी घातली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-अनेक शारिरिक कमी होत्या, तरीही हे ५ खेळाडू ठरले सर्वश्रेष्ठ






