भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी२० सामने खेळायचे आहेत. या मालिकांदरम्यान भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक अनुभवी खेळाडू अनुपलब्ध आहेत. त्याचमुळे श्रीलंका दौऱ्यातील मालिकांसाठी मर्यादीत षटकांच्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. सध्या भारतीय संघासोबत श्रीलंकेत असलेल्या कृष्णाप्पा गौतम व ऋतुराज गायकवाड यांचा एक व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला असून, यामध्ये दोघेही आपली मातृभाषा एकमेकांना शिकवताना दिसत आहेत.
गमतीदार आहे व्हिडिओ
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करणारा महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड व कर्नाटकचा कृष्णप्पा गौतम यांची प्रथमच भारतीय संघात निवड झाली आहे. सध्या भारतीय संघ कोलंबो येथे असून, तेथेच या दोघांनी एक अल्टिमेट चॅलेंजचा व्हिडिओ बनविला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून या दोघांचा व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये हे दोघे एकमेकाला आपली मातृभाषा शिकवताना दिसले.
व्हिडिओच्या सुरवातीला गौतम हा कर्नाटकची राज्यभाषा असलेल्या कन्नडमध्ये बोलताना दिसून आला. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या भाषेतील काही शब्द शिकण्याचे ठरवले. ऋतुराजने त्याला मराठीत ‘एक ग्लास पाणी आणशील?’ हे वाक्य बोलण्यास सांगितले. ते त्यांनी यशस्वीरीत्या बोलून दाखवले. गौतम याने कन्नडमध्ये उजव्या हाताचा फलंदाज आला काय म्हणतात हे ऋतुराजला शिकवले.
आगामी मालिकेमध्ये मैदानावर फायदा व्हावा या हेतूने ऋतुराजने गौतमला ‘बुंध्यात टाक’ म्हणजे यॉर्कर फेक हा शब्द शिकवला. यानंतरही या दोन्ही खेळाडूंमध्ये अनेक शब्दांची देवाणघेवाण झाली. व्हिडिओच्या अखेरीस दोन्ही खेळाडूंनी आपापल्या भाषेत धन्यवाद म्हणत श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भेटण्याचा शब्द दिला.
https://twitter.com/BCCI/status/1413000682513252352
असा असेल भारतीय संघाचा श्रीलंका दौरा
भारताच्या श्रीलंका दौऱ्याला १३ जुलैपासून वनडे मालिकेने सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर तीन सामन्यांची टी२० मालिका होईल. हे सर्व सामने कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत. शिखर धवन प्रथमच भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
व्वा! वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ‘दादा’च्या घरी पोहोचल्या बंगालच्या मुख्यमंत्री






