भारतीय उपखंडाला पहिल्यापासून फिरकी गोलंदाजांची फॅक्टरी म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही सर्वोत्कृष्ट फिरकीपटू होऊन गेले; त्यातील सर्वाधिक फिरकीपटू हे भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांतील असल्याचे दिसून येतात. जिम लेकर, लान्स गिब्स, शेन वॉर्न ही काही भारतीय उपखंडाबाहेरील नावे ज्यांनी फिरकी गोलंदाजीला एक ओळख दिली. ज्याप्रकारे, भारतीय उपखंडातील फिरकीपटू चांगली कामगिरी करतात, त्याचप्रकारे उपखंडातील फलंदाज देखील फिरकी गोलंदाजी उत्कृष्ट खेळतात.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व फलंदाज अतिशय निपुणतेने फिरकी गोलंदाजी खेळत असलेले आपण पाहतो. मात्र, याआधी ७०-८० च्या दशकात अशी परिस्थिती नव्हती. भारतीय उपखंडाबाहेरील फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध खेळताना तितकेसे सहज दिसत नव्हते. त्यांना फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना अनेक संकटांचा सामना करावा लागत. चेंडू किती फिरकी घेणार आहे; याचा अंदाज येईपर्यंत चेंडू यष्ट्यांवर आदळलेला असत किंवा बॅटची कड घेऊन, क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला असायचा. उपखंडाबाहेरील फलंदाजांना फिरकी गोलंदाजी खेळता येत नाही; हा समज मोडून काढण्याचे काम सर्वप्रथम केले ते इंग्लंडच्या ग्रॅहम गूच यांनी. गूच यांनी १९८७ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध केलेल्या त्या ऐतिहासिक खेळीला ३४ वर्षे होऊन गेली.
उपांत्य सामन्यापूर्वीची पार्श्वभूमी
प्रथमच इंग्लंडबाहेर आयोजित केलेल्या विश्वचषकात ‘अ’ गटातून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरी गाठली. ‘ब’ गटातून पाकिस्तान आणि इंग्लंड हे संघ पुढे आले. पहिला उपांत्य सामना पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगला आणि त्यात पाकिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत जागा मिळवली. दुसरा उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार होता. भारत आपल्या गटात अव्वल स्थानावर होता; तर इंग्लंडला पाकिस्तानकडून साखळी सामन्यात दोन वेळा पराजय स्वीकारावा लागल्याने दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. भारतीय संघाला दुसऱ्या उपांत्य सामन्यात संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. इंग्लंडकडे १९७९ विश्वचषकानंतर अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी होती.
इंग्लिश सलामीवीरांची सावध सुरुवात
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ५ नोव्हेंबर रोजी दोन्ही संघ आमनेसामने आले. भारतीय कर्णधार कपिल देव यांनी नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून ग्रॅहम गूच आणि टीम रॉबिन्सन ही अनुभवी सलामी जोडी मैदानात उतरली. पहिल्याच षटकात कपिल देव यांचा चेंडू गूच यांच्या पॅडवर आदळला आणि भारतीय खेळाडूंनी जोरदार अपील केले. मात्र पंचांनी गूच यांना नाबाद ठरवले. त्यानंतर, दोघा सलामीवीरांनी सांभाळून खेळत वेगवान गोलंदाजांचा स्पेल यशस्वीरित्या खेळून काढला. १२ षटकात इंग्लंडने ४० धावा काढल्या होत्या.
चेंडू जुना झाला आणि भारतीय फिरकीपटू गोलंदाजीला आले. संपूर्ण स्पर्धेत मणिंदर सिंह आणि अष्टपैलू म्हणून खेळणाऱ्या रवी शास्त्री यांनी भारताच्या फिरकी विभागाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली होती. उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या सामन्यात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा सर्वांनी बाळगली होती. . स्पर्धेत सर्वात यशस्वी ठरलेल्या मणिंदर सिंह यांनी गोलंदाजीला येत पहिल्याच षटकात रॉबिन्सन यांना यष्टीरक्षक किरण मोरेंच्या हातून यष्टिचित केले. रॉबिन्सन यांच्या जागी बिल ऍथे मैदानात उतरले. भारतीय फिरकी आक्रमण सुरु झाले आणि ग्रॅहम गूच यांनी एका अप्रतिम आणि ऐतिहासिक खेळीला नव्याने सुरुवात केली. गूच हे वेगवान गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करायला सर्वात सक्षम फलंदाज मानले जात. जगभरातील भलेभले गोलंदाज त्यांच्यापुढे नांग्या टाकत. मात्र, त्यादिवशी ते वेगळ्याच अंदाजात खेळणार होते.
गूच यांचा ‘स्वीप अटॅक’
मणिंदर सिंह आणि रवी शास्त्री यांनी दोन्ही बाजूने गोलंदाजी करायला सुरुवात केली. जसे भारतीय गोलंदाज चेंडू वळवू लागले, तसे गूच यांनी गुडघ्यावर बसत स्वीप मारायला सुरुवात केली. फाईन लेगला जागा हेरत ते धावा वसूल करू लागले. दुसऱ्या बाजूला ऍथे यांना फिरकी गोलंदाजी खेळणे अवघड जात होते. अखेरीस, चेतन शर्मा यांच्या गोलंदाजीवर ते मोरेंकडे झेल देऊन बाद झाले. गूच यांच्या साथीला कर्णधार माईक गॅटींग मैदानात आले. तोपर्यंत गूच यांनी सामन्यावर इंग्लंडला नियंत्रण मिळवून दिले होते. गूच-गॅटींग या अनुभवी जोडीने मनसोक्तपणे भारतीय गोलंदाजांची परीक्षा घेत धावा जमवल्या.
डोक्यावर सनहॅट, ओठांवर मिश्या, मजबूत मनगट आणि चेहऱ्यावरील बेदरकार भावांसह त्यांनी भारताच्या दोन्ही डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मणिंदर यांनी हरतऱ्हेचे चेंडू टाकले. शास्त्री देखील गती परिवर्तन करुनही यश मिळत नसल्याने हतबल झाले. मात्र, गूच यांच्या धावांचा ओघ काही थांबला नाही. त्यांच्या स्वीपचे फटके अतिशय योग्यरीत्या बसत होते आणि सामना भारताच्या हातून निसटत होता. दुसऱ्या बाजूने, गॅटींगसुद्धा आपल्या साथीदाराच्या खेळाला योग्य साथ देत होते. खराब चेंडूंवर धावा वसूल करत, त्यांनी धावफलक हलता ठेवला होता.
अखेरीस, मणिंदर यांनी जिंकले युद्ध
फिरकी गोलंदाजांना यश मिळत नाही हे पाहून कपिल देव स्वतः गोलंदाजीला आले. गॅटींग यांनी त्यांना चौकार मारत त्यांच्या डावपेचांवर पाणी फिरले. गूच यांच्याप्रमाणे गॅटींग हेदेखील स्वीप मारू लागले. अखेरीस, मनिंदर यांच्या चेंडूवर गॅटींग त्रिफळाचीत झाले. बाद होण्यापूर्वी त्यांनी अशा ६२ चेंडूत आक्रमक ५६ धावा काढल्या होत्या. गूच-गॅटींग जोडीने १९ षटकात ११७ धावांची भागीदारी करत इंग्लंडला सामन्यात पुढे नेऊन ठेवले होते.
गूच यांनी आपले शतक यादरम्यान पूर्ण केले. दर्जेदार गोलंदाजांविरूद्ध केलेली ही खेळी विश्वचषकातील सर्वोत्तम खेळ्यांपैकी एक होती. धावफलकावर २०३ धावा लागल्या होत्या. इंग्लंड मोठ्या धावसंख्येचे दिशेने आगेकूच करत होता. पण, म्हणतात ना, “आपली आवडती गोष्टच आपला घात करते.”
नेमका हाच अनुभव गूच यांना आला. ज्या स्वीप फटक्याच्या जोरावर त्यांनी ही सुंदर खेळी साकारली होती त्याच स्वीपमुळे ते बाद झाले. मणिंदर यांचा चेंडू स्वीप करण्याच्या नादात उंच उडाला आणि डीप स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्या हाती विसावला. गूच यांची १३६ चेंडूतील लाजवाब खेळी संपुष्टात आली होती.
गूच यांनी आखली होती विशेष रणनीती
गूच यांच्या या जबरदस्त खेळीविषयी सांगताना तत्कालीन कर्णधार माईक गॅटींग यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी गूच दोन दिवस फक्त स्वीपचा सराव करत होता. नेटमध्ये त्याने स्वीपचे फटके चांगलेच घोटून घेतले होते. सरावात घेतलेली मेहनत त्याने सामन्यात प्रत्यक्षात उतरवली.”
भारताला पहावे लागले पराभवाचे तोंड
गूच बाद झाल्यानंतर, इतर फलंदाज जास्त योगदान देऊ शकले नाहीत. ऍलन लॅम्ब यांनी ३२ धावा बनवत इंग्लंडची धावसंख्या २५४ पर्यंत नेली. भारतीय संघ ही धावसंख्या पार करून अंतिम फेरीत जागा पटकावणार, अशी आशा सर्वांना वाटत होती. आपल्या घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सुनील गावसकर यांच्याकडून एक दमदार खेळी व्हावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत होते. मात्र, गावसकर अवघ्या ४ धावा करू शकले. सर्व फलंदाज नियमित अंतराने बाद होत राहिल्याने, भारताचा डाव २१९ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून मोहम्मद अझरुद्दिनने सर्वाधिक ६४ धावा काढल्या. इंग्लंडने या विजयासह अंतिम फेरीत जागा निश्चित केली. गूच यांना सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हा त्यांचा स्पर्धेतील तिसरा सामनावीर पुरस्कार होता. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पराभूत करत आपले पहिले विश्वविजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात इंग्लंड पराभूत झाला असला तरी गूच यांनी भारताविरुद्ध उपांत्य फेरीत केलेली दमदार शतकी खेळी आजही ‘ट्रेंडसेटर’ म्हणून ओळखली जाते.
ट्रेंडिंग लेख-
दसऱ्याच्या दिवशी कुंबळे आणि श्रीनाथने भारताला करून दिले होते विजयाचे सीमोल्लंघन
ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार आहे अहमदाबादचं मोटेरा स्टेडियम!! याच मैदानात झालेत ‘हे’ खास विक्रम
अफाट प्रतिभेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्याय न देऊ शकलेले नरेंद्र हिरवानी