क्रिकेटमध्ये अनेक अविस्मरणीय सामने झाले आहेत. त्यातीलच एक म्हणजे 16 जून 1922 रोजी एजबस्टनच्या मैदानावर हँपशायर आणि यॉर्कशायर या दोन संघांदरम्यान झालेला सामना. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पहिल्या डावात हँपशायर संघ फक्त 15 धावांवर आटोपला. परंतु, तरीदेखील त्यांनी यॉर्कशायर संघावर विजय मिळवला. या सामन्यात 10 व्या क्रमांकाच्या फलंदाजाने शतक झळकावले होते आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.
पहिल्या डावात हँपशायरची लज्जास्पद कामगिरी
बर्मिंघमच्या एजबस्टन मैदानावर झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात यॉर्कशायर संघाने 223 धावा केल्या. फॅड्रिक सेंटॉल याने 83 धावा केल्या तर कर्णधार कालथोरपेने 70 धावांची खेळी केली होती. यॉर्कशायर संघाला प्रत्युत्तर द्यायला उतरलेल्या हँपशायर संघासोबत जे घडले त्याविषयी कोणी विचार देखील केला नसेल.
हँपशायरचा संघ लज्जास्पदरित्या 15 धावांवर गारद झाला. संपूर्ण संघ फक्त 8.5 षटक मैदानात टिकू शकला. 8 फलंदाजांना तर खाते देखील उघडता आले नाही आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला फील मिड 6 धावांवर नाबाद राहिला. यॉर्कशायरच्या फक्त दोन गोलंदाजांनी हँपशायर संघाला जेरीस आणले होते . हॅरी हॉवेलने फक्त 7 धावा देऊन 6 बळी टिपले होते तर फ्रेडी कालथोरपेने 4 फलंदाज माघारी पाठवले होते.
हँपशायरने केला चमत्कार
पहिल्या डावात फक्त 15 धावांवर बाद झालेल्या हँपशायरला यॉर्कशायर संघाकडून फॉलोऑन मिळाला आणि दुसऱ्या डावात देखील हँपशायरचा संघ संकटात सापडला होता. त्यांचे 6 फलंदाज 177 धावांवर बाद झाले होते. असे वाटत होते की यॉर्कशायर हा सामना आरामशीर जिंकेल, परंतु असे घडले नाही. जॉर्ज ब्राउनच्या जबाबदार फलंदाजीमुळे हँपशायरचा संघ 272 धावांपर्यंतच पोहोचला आणि त्यानंतर मैदानावर आला यष्टीरक्षक वॉल्टर लिव्हसी.
वॉल्टरने ब्राउनसोबत नवव्या बळीसाठी तब्बल 177 धावांची भागीदारी केली. 10 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या वॉल्टर लिव्हसीने शानदार शतक झळकावले तर जॉर्ज ब्राउनने 172 धावांची जबरदस्त खेळी केली. या दोघांच्या भागीदारीच्या मदतीने
हँपशायर संघाने दुसऱ्या डावात 521 धावा केल्या आणि यॉर्कशायर संघासमोर 314 धावांचे लक्ष्य ठेवले.
हँपशायरची जबरदस्त गोलंदाजी
फलंदाजांच्या चमत्कारानंतर आता वेळ हँपशायरच्या गोलंदाजांची होती. ज्यांनी यॉर्कशायरच्या फलंदाजांना दुसऱ्या डावात हैराण करून सोडले. एलेक्स केनेडी आणि जॅक न्यूमेन या दोघा गोलंदाजांनी यॉर्कशायर फलंदाजीची वरची फळी उध्वस्त करून टाकली. फक्त 89 धावांवर यॉर्कशायरने 6 फलंदाज गमावले. एका वेळी हा सामना हमखास जिंकणार असे वाटत असलेला यॉर्कशायरचा संघ दुसऱ्या डावात 158 धावांवर गारद झाला आणि त्यांनी हा सामना देखील 155 धावांनी गमावला.
महत्त्वाच्या बातम्या –
ट्रेंट बोल्टने रोहित शर्माला आयपीएल दरम्यानच दिली आहे ‘ही’ चेतावणी, आता राहावे लागणार सावध
रोहित शर्माला WTC फायनलपूर्वी व्हीव्हीएस लक्ष्मणचा ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ सल्ला