क्रिकेट, द जंटलमन्स गेम, जेव्हापासून क्रिकेट खेळायला सुरुवात झाली, तेव्हापासून क्रिकेटची हीच ओळख आहे. सभ्य माणसांनी खेळायचा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिले जाते. हे असे असले तरी, क्रिकेटमध्ये अजिबातच बेइमानी होत नाही असे बिलकुल नाही. एखादा खेळाडू, कधी पूर्ण संघ, तर कधी अख्खी मॅनेजमेंट क्रिकेटची ही ओळख पुसण्याचा प्रयत्न करतात. मॅच फिक्सिंग, बॉल टेम्परिंग हे क्रिकेटला कलंकित करणारे प्रकार अनेकदा घडले. या गोष्टी वारंवार होत नसल्या तरी अधूनमधून या प्रकरणांच्या बातम्या येतच असतात. परंतु, अशा काही छोट्या आणि नियमबाह्य घटना असतात. ज्या त्या सामन्यावर मोठा परिणाम करतात. अशीच क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी बेइमानी केली होती हॅन्सी क्रोनिएने. दक्षिण आफ्रिकेच्या कॅप्टनने आणि तीदेखील विश्वचषकामध्ये.
साल होते १९९९ जवळपास १७ वर्षानंतर क्रिकेटचा महाकुंभ जन्मदात्या इंग्लंडमध्ये होत होता. सारेच संघ अतिशय तुल्यबळ वाटत होते. त्यातली त्यात तगड्या ऑलराऊंडर्सची फौज घेऊन उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला सारेच फेवरेट मानत होते. कॅप्टन क्रोनिए, जॅक कॅलिस, क्लुजनर, जॉन्टी ऱ्होड्स, हर्षेल गिब्स, पोलॉक, डोनाल्ड अशी दहशत वाढवणारी नावे त्या संघात होती. ८ वर्षांपूर्वी उध्वस्त झालेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा संघ मैदानात उतरलेला.
21 years ago, Hansie Cronje wore an earpiece so that coach Bob Woolmer could give him instructions during their 1st match against India in the '99 WC. Ganguly mentioned it to the umpires & though they used it that day, SA were barred from using it for the rest of the tournament. pic.twitter.com/g0lGpa9Pq3
— Joy Bhattacharjya (@joybhattacharj) May 15, 2020
दक्षिण आफ्रिकेला आपल्या अभियानाची सुरुवात करायची होती भारताविरुद्ध. ब्रायटन होवच्या काऊंटी ग्राउंडवर ही मॅच होणार होती. भारताचा कर्णधाक मोहम्मद अझरुद्दीनने टॉस जिंकला अन् बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. गांगुली आणि तेंडुलकर ही जोडी मैदानात उतरली. त्यांनी आत्मविश्वास दाखवत आफ्रिकेच्या तुफानी गोलंदाजांचा सामना करायला सुरुवात केली.
त्यावेळी गांगुली विश्वचषकातील आपला पहिला सामना खेळत होता. माध्यमांतील वृत्तानुसार, त्याने फलंदाजी करताना पाहिले की, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्रोनिए क्षेत्ररक्षणाला उभा राहिला असताना स्वतःशीच काही तरी बडबडतोय अगदी असाच प्रकार त्याला ऍलन डोनाल्डकडून घडताना दिसला. तो विचार करत राहिला हे नक्की काय सुरू आहे?
इतक्यात ड्रिंक्स ब्रेक झाला. पाणी प्यायचं सोडून गांगुलीने पटकन अंपायर स्टीव्ह बकनर आणि डेव्हिड शेफर्ड यांच्याकडे धाव घेतली. त्याने आपली शंका उपस्थित केली. क्रोनिए आणि डोनाल्ड स्वतःशीच काहीतरी बोलत आहेत. याची कल्पना त्याने दोघांना दिली. अंपायर्सनी क्रोनिएला बोलावून घेतले आणि झाल्या प्रकाराची शहानिशा केली.
यानंतर जो खुलासा झाला तो सर्वांना धक्का देणारा होता. क्रोनिए चक्क कानात एअरपिस घालून. आपले कोच बॉब वूल्मर यांच्याशी बोलत होता. चालू सामन्यामध्ये कोचिंग घेत होता. दोन्ही अंपायर्सना समजेना काय निर्णय घ्यावा? कारण त्यावेळी असा कुठेही लिखित नियम नव्हता की, अशा प्रकारची एअरपिस घालून ग्राउंडमध्ये येता येणार नाही. अंपायर्सने प्रकरण मॅच रेफ्री असलेल्या पाकिस्तानच्या तलत अली यांच्याकडे वर्ग केले. त्यांनाही याबाबत काय करावे हे समजेना. त्यांनी थेट आयसीसीच्या ऑफिसमध्ये फोन लावला. थोडी चर्चा झाल्यानंतर त्या दोघांचे एअरपिस काढून घेण्याचा निर्णय घेतला गेला.
या सामन्याचा निकाल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला. गांगुलीच्या ९७ धावांच्या इनिंगला कॅलिसची ९६ धावांची इनिंग सरस ठरली. दक्षिण आफ्रिकेने चार विकेट्स राखून विजय मिळवत मिशन विश्वचषक सुरू केले.
पुढे बरेच दिवस क्रोनिएच्या एअरपिस प्रकरणाची चर्चा चालली. वूल्मर यांनी स्पष्टीकरण देत म्हटले, माझा कोणताही वाईट हेतू नव्हता. मी केवळ तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या कृतीमुळे कोणाला वाईट वाटले असेल, तर मी सर्वांची माफी मागतो. तहयात वादग्रस्त राहिलेल्या क्रोनिए-वूल्मर जोडीचा शेवटही तितकाच अनपेक्षित होता. मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे करियर बरबाद झालेला क्रोनिए २००२ मध्ये विमान अपघातात गेला आणि वूल्मर यांचे २००७ विश्वचषकावेळी रहस्यमयरीत्या मृत्यू झाला. एक कर्णधार आणि एक प्रशिक्षक म्हणून ‘ग्रेट’ असणाऱ्या या दोघांच्याही करिअरमध्ये ‘एअरपिस’ प्रकरण काळा डाग म्हणून राहिले ते कायमचेच!
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाचा-
कोण आहे ‘ज्युनियर मलिंगा’ मथीशा पथिराना, ज्याने सीएसकेकडून केले दिमाखात आयपीएल पदार्पण
अँड्र्यू सायमंड्सला ‘रॉय’ म्हणतात तरी का? रोचक आहे कारण