भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सीरिजमध्ये २-१ च्या फरकाने ऑस्ट्रेलियावर मात करत जगभरात विजयी डंका वाजवला आहे. परंतु याच भारतीय संघावर ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात अवघ्या ३६ धावांवर सर्वबाद होण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर पुढील कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत मालिका खिशात घातली. भारताचा कसोटीपटू हनुमा विहारी याने कशाप्रकारे भारतीय खेळाडूंनी स्वत:ला सावरले आणि मालिकेत दमदार पुनरागमन केले, याचा खुलासा केला आहे.
ब्रिस्बेन कसोटीत खेळण्याची होती इच्छा
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना विहारी म्हणाला की, “ब्रिस्बेन कसोटीत विजेता ठरलेल्या भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनचा मीदेखील भाग असतो तर मला खूप आनंद झाला असता. दुखापतग्रस्त असल्यामुळे मला या मालिकेत विशेष कामगिरी करता आली नाही. काही गोष्टी माझ्या नियंत्रणाबाहेर होत्या.”
प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केले प्रोत्साहित
ऍडलेड कसोटीतील लाजिरवाण्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममधील वातावरणाविषयी बोलताना विहारी म्हणाला की, “मला नाही वाटत की त्या सामन्यानंतर आमची बैठक झाली. संघ व्यवस्थापनाने नंतर त्या सामन्याबाबत जास्त चर्चा न करण्याचा निर्णय घेतला होता. पुढे मेलबर्न कसोटीपुर्वी आमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितले होते की, ऍडलेडमध्ये जे काही घडले ती एकवेळची गोष्ट होती. यानंतर पुन्हा आपल्यासोबत असे कधीच घडणार नाही. सर्वांनी त्या गोष्टीचा विसर पाडावा आणि पुढील तीन सामन्यांवर लक्ष केंद्रित करावे.”
“तसेच विराट कोहली गेल्यामुळे आम्हाला स्वत:वर आणि आमच्या खेळावर विश्वास ठेवून पुढे वाटचाल करायची होती. खरे तर, ऍडलेड मधील लज्जास्पद पराभव आमच्यासाठी आशिर्वाद ठरला, कारण यामुळे भारतीय संघ एकत्र आला”, असे पुढे विहारीने सांगितले.
सिडनी कसोटी अनिर्णित राखण्याच्या हेतूनेच उरतला होता मैदानावर
विहारी आणि आर अश्विन सिडनी कसोटीचे नायक ठरले होते. वरच्या फळीतील धाकड फलंदाजांची विकेट गेल्यानंतर संघावर सामना पराभूत होण्याची वेळ आली होती. परंतु विहारी आणि अश्विन यांनी १३० पेक्षा जास्त षटके नाबाद फलंदाजी करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले होते.
या सामन्यातील अखेरच्या दिनासंदर्भात बोलताना विहारी म्हणाला की, “आम्हाला ४००हून अधिक धावा करायच्या होत्या. आमच्याकडे फक्त २ शक्यता होत्या. एक म्हणजे, सामना अनिर्णित राखणे. दुसरे म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा विजय. परंतु ज्याप्रकारे रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी फलंदाजी केली. ते पाहता आमच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु पुढे ते दोघेही बाद झाले.”
“रविंद्र जडेजा फलंदाजी करण्यासाठी फिट नव्हता आणि अश्विनलाही दुखापत झाली होती. त्यामुळे आमच्याकडे फक्त सामना अनिर्णित राखण्याचा पर्याय उरला होता. अश्विन आणि माझा मैदानावर उतरल्यानंतर सामना अर्निणित राखण्याचा आणि मालिका १-१ ने बरोबरीवर ठेवण्याचा उद्देश होता. सामना संपल्यानंतर आम्हाला कळाले की, आम्ही चक्क ३ तास फलंदाजी केली होती”, असे शेवटी विहारी म्हणाला.
विहारी सावरतोय हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून
सिडनी कसोटीपुर्वीच विहारीला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. तरीही या सामन्यात खेळाडू वृत्ती दाखवत त्याने फलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलिया दौरा संपवून मायदेशी परतल्यानंतर विहारी बेंगळुरू येथे स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल सन्मान आहे”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य






