डॉन ब्रॅडमन! हे नाव ऐकले तरी प्रत्येक क्रिकेटपटू आणि क्रिकेटप्रेमी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थाने क्रिकेटचे डॉन म्हणता येईल, अशी ख्याती ब्रॅडमन यांची होती. आपल्या खेळण्याच्या काळात असंख्य विक्रम ब्रॅडमन यांनी आपल्या नावे केलेले. त्याकाळी, ब्रॅडमन यांच्या आसपास जाईल असा क्रिकेटपटू नव्हता. मात्र, १९४८ मध्ये ब्रॅडमन यांचा सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम एक महाराष्ट्रीयन क्रिकेटपटू तोडणार होता. परंतु, विरोधी संघाने मैदान सोडल्याने हा विश्वविक्रम पूर्ण झाला नाही. ब्रॅडमन यांना जवळपास गाठलेले हे मराठमोळे फलंदाज होते भाऊसाहेब निंबाळकर.
लहान वयात मिळवली क्रिकेटमध्ये निपूणता
कोल्हापुरातील एका वजनदार घराण्यात जन्मलेले भाऊसाहेब लहानपणापासूनच इंग्रजांचा खेळ म्हणून हिणवल्या गेलेल्या क्रिकेटमध्ये पारंगत होते. संस्थानिकांचा असलेला हा खेळ हळूहळू संपूर्ण भारतात सर्व स्तरातील लोक खेळू लागली होती. भाऊसाहेब यांनीदेखील अगदी लहान वयातच क्रिकेटची बॅट पकडली आणि इतरांपेक्षा लवकर चांगले कौशल्य आत्मसात करून घेतले. ते कोल्हापुरातील मॉडेल स्कूल शाळेचे पंधराव्या वर्षी कर्णधार बनले होते. त्यांचा खेळ पाहून बडोदा संस्थानाने त्यांना वयाच्या विसाव्या वर्षी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी दिली. त्यांनी दोन हंगाम बडोदा संघाकडून खेळल्यानंतर, आपले गृहराज्य असलेल्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली.
जेव्हा ब्रॅडमन यांचा विक्रम आला होता निंबाळकर यांच्या टप्प्यात
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बर्यापैकी कामगिरी करत असलेल्या भाऊसाहेब यांना खरी ओळख मिळाली ती १९४८-१९४९ सालातील रणजी ट्रॉफी दरम्यान, महाराष्ट्र विरुद्ध काठियावाड यांच्यातील सामन्यातून. भाऊसाहेब यांना या सामन्यात साक्षात डॉन ब्रॅडमन यांचा एका डावातील सर्वाधिक वैयक्तिक धावांचा विक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी लाभली होती. मात्र, विरोधी काठियावाड संघाने खिलाडूवृत्ती दाखवली नाही आणि भाऊसाहेब निंबाळकर हे नाव इतिहासात नोंद होऊ शकले नाही.
महाराष्ट्राची जोरदार फलंदाजी
त्याचे झाले असे की, १९४८-१९४९ रणजी ट्रॉफीतील साखळी सामना पुण्यातील पूना क्लब मैदानावर खेळला जात होता. महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी पहिल्या दिवशी पाहुण्या काठियावाड संघाचा डाव २३८ धावांवर संपवला. पहिल्या दिवशीच महाराष्ट्राने एक बाद १३२ असे प्रत्युत्तर दिले. ८१ धावांवर पहिला गडी बाद झाल्यानंतर, भाऊसाहेब निंबाळकर मैदानात उतरले होते.
दुसऱ्या दिवशी भांडारकर आणि निंबाळकर या जोडीने काठियावाड संघाला अजिबात संधी न देता धावांची लयलूट केली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ४५५ धावा जोडत काठियावाड संघाला सामन्यातून जवळपास बाहेर केले. भांडारकर यांनी होण्यापूर्वी सहा तास फलंदाजी करत २०५ धावांची लाजवाब खेळी केली. भांडारकर बाद झाल्यानंतर आलेल्या प्रा. डीबी देवधर यांचे पुत्र सुंदर यांनीदेखील मैदानावर नांगर टाकला. दुसऱ्या दिवसाखेर महाराष्ट्राची धावसंख्या २ बाद ५८७ अशी भक्कम झाली होती.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी देखील निंबाळकर-देवधर जोडीने धावांचा ओघ कमी केला नाही. देवधर आपले शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरले आणि ९२ धावांवर बाद झाले. त्यानंतर महाराष्ट्राला चौथा धक्का लवकरच बसला. मात्र, निंबाळकर हे अजिबात बाद व्हायच्या स्थितीत नव्हते. त्यांनी आपली धावगती कायम राखली होती. लवकरच निंबाळकर यांनी आपल्या ४०० धावा पूर्ण केल्या आणि महाराष्ट्राची धावसंख्या ८०० धावांच्या पलीकडे नेली.
चहा- पानापर्यंत ४४३ धावांवर नाबाद होते निंबाळकर
निंबाळकर यांनी ४०० धावांचा टप्पा पार केल्यानंतर त्यांची नजर डॉन ब्रॅडमन यांच्या ४५२ धावांच्या विश्वविक्रमाकडे लागली. ब्रॅडमन यांनी ही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या १९२९-१९३० च्या हंगामात न्यू साउथ वेल्सकडून खेळताना क्वीन्सलँड संघाविरुद्ध केली होती. तिसऱ्या दिवशी जेव्हा खेळ चहापाण्यासाठी थांबला, तेव्हा महाराष्ट्राची धावसंख्या होती चार बाद ८२६. आधी भाऊसाहेब निंबाळकर यांची वैयक्तिक धावसंख्या नाबाद ४४३. ब्रॅडमन यांचा विश्वविक्रम मोडण्यापासून ते अवघ्या १० धावा दूर होते. निंबाळकर ज्या फॉर्ममध्ये खेळत होते, त्यावरून ते ब्रॅडमन यांचा विश्वविक्रम सहजरीत्या मोडणार हे स्पष्ट होते.
काठियावाड संघाची अखिलाडूवृत्ती
महाराष्ट्राच्या संघातील खेळाडू चहा- पानानंतर निंबाळकर ब्रॅडमन यांचा विश्वविक्रम मोडणार या कल्पनेने खुश होते आणि इतक्यात विरोधी संघाचे कर्णधार राजकोटचे ठाकूर साहेब यांनी महाराष्ट्र संघाच्या आनंदावर विरजण टाकण्याचे काम केले. त्यांनी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये येऊन सांगितले की, ‘तुम्ही तुमचा डाव घोषित करा अन्यथा आम्ही यापुढे या सामन्यात खेळणार नाही.’
राजकोट ठाकूर साहेब यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले. कारण, भाऊसाहेब निंबाळकर हे एका अद्वितीय विक्रमापासून अवघ्या १० धावा दूर होते. महाराष्ट्र संघाच्या कर्णधारांनी काठियावाड संघाला अवघी दोन षटके गोलंदाजी करण्याची विनंती केली. जेणेकरून भाऊसाहेब निंबाळकर ४५३ धावा करून ब्रॅडमन यांचा विक्रम मोडतील. मात्र, त्यांनी ती मागणी फेटाळून लावली. महाराष्ट्र संघ निंबाळकर यांच्या त्या विश्वविक्रमी खेळीसाठी अडून बसला आणि अखेरीस काठियावाड संघाने महाराष्ट्र संघ डाव घोषित करत नाही हे पाहून, रेल्वे स्टेशनचा मार्ग धरला.
ब्रॅडमन यांनी केले कौतुक
विरोधी संघाच्या अखिलाडूवृत्तीमुळे एक भारतीय फलंदाज क्रिकेटमधील एक सर्वात मोठा विक्रम मोडला पासून वंचित राहिला. काठियावाड संघ निघून गेल्याने, महाराष्ट्राला विजयी घोषित करण्यात आले. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच भाऊसाहेब निंबाळकर यांचे लग्न देखील होते. क्रिकेटच्या मैदानावरील आपला हा डाव अपूर्ण राहिला असला, तरी आयुष्यातील एक नवा डाव त्यांनी सुरू केला होता.
निंबाळकर यांच्या खेळीनंतर खुद्द डॉन ब्रॅडमन यांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले होते. ब्रॅडमन म्हणालेले, ‘निंबाळकर तुमची खेळी माझ्या खेळीपेक्षा नक्कीच उत्तम होती.’
सातत्यपूर्ण कामगिरी नंतरही मिळाली नाही राष्ट्रीय संघात जागा
भाऊसाहेब निंबाळकर यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये २६ हंगाम खेळले. ज्यात त्यांच्या नावे ४७.९३ च्या सरासरीने ४,८४१ जमा होत्या. देशांतर्गत क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही भाऊसाहेब निंबाळकर एकदाही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करू शकले नाहीत. त्याविषयीची खंत व्यक्त करताना निंबाळकर म्हणाले होते, “मला राष्ट्रीय संघाकडून खेळायला मिळाले नाही, हा एक प्रकारे अन्याय होता. मी भारतासाठी एक अनधिकृत सामना खेळलो. मात्र, अधिकृत कसोटी सामने खेळणे माझ्या नशिबात नव्हते. मला माहीत नाही, निवडकर्त्यांनी मला का डावलले? माझ्यापेक्षा काहीशा सुमार दर्जाच्या खेळाडूंनाही भारतीय संघाकडून खेळण्याची त्यावेळी संधी मिळाली होती.”
भाऊसाहेब निंबाळकर यांना राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही, तरीही भारतीय क्रिकेटमधील त्यांचे योगदान कायमच आठवले जाते. डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाच्या जवळपास जाणारा पहिला खेळाडू महाराष्ट्रीयन होता याचा सर्व महाराष्ट्राला अभिमान वाटतो.






