क्रिकेट जेव्हापासून सुरू झाले तेव्हापासून भारतीय उपखंड, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि कॅरेबियन बेटांवर चांगलेच प्रसिद्ध झाले. याच देशांनी क्रिकेटवर राज्य देखील केले. मात्र, मागच्या जवळपास पंधरा वर्षाच्या काळात बांगलादेश, आयर्लंड, अफगाणिस्तान यासारख्या छोट्या देशांनी सुद्धा मोठ्या क्रिकेट संस्कृती असलेल्या देशांना पराजित करण्याची किमया केली आहे. त्यापैकी एक म्हणजे आयर्लंडने पाकिस्तान, इंग्लंड, वेस्टइंडीज सारख्या देशांना विश्वचषकात सुद्धा पराभूत केले आहे. अनेक अनुभवी व युवा खेळाडूंच्या कामगिरीच्या बळावर आयर्लंड 2018 मध्ये कसोटी खेळण्यासाठी पात्र देखील ठरला. आयर्लंड क्रिकेटच्या या यशाच्या वाटचालीत पॉल स्टर्लिंग याचा सिंहाचा वाटा राहिला आहे. रविवारी (दि. 03 सप्टेंबर) स्टर्लिंगचा 33वा वाढदिवस. या निमित्ताने त्याच्याविषयी जाणून घेऊयात…
दिनांक 3 सप्टेंबर 1990 मध्ये आयर्लंडमधील बेलफास्ट या शहरात, पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) याचा जन्म झाला. त्याचे वडील ब्रायन, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. ते आयरिश स्कूल आणि अल्स्टर टाउन यांच्यासाठी क्रिकेट खेळले, परंतु महत्त्वाचे म्हणजे ते आंतरराष्ट्रीय रग्बी युनियनचे रेफरी होते. पॉलचा मोठा भाऊ रिचर्ड याने 2006 च्या 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे.
आयर्लंडमधील सर्वात प्रतिभावान युवक क्रिकेटपटू म्हणून पुढे आलेल्या स्टर्लिंगने वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. न्यूझीलंडविरुद्धच्या या एकदिवसीय सामन्यात 303 धावांचा पाठलाग करताना आयर्लंड संघाने त्याला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. मात्र, तो अवघ्या 4 धावा करू शकला. आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या काही महिन्यांपूर्वी स्टर्लिंगने आयर्लंडकडून प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. आयसीसी इंटरकॉन्टिनेंटल चषक 2009 मध्ये त्याने केनिया विरुद्ध आपले पहिलेवहिले प्रथमश्रेणी शतक झळकावले.
स्टर्लिंगच्या कामगिरीने प्रभावित होऊन अव्वल काउंटी क्लब मिडलसेक्सने डिसेंबर 2009 मध्ये त्याच्याशी तीन वर्षाचा करार केला. याच दरम्यान तो, त्यावेळचा आयर्लंडचा खेळाडू व सध्याचा इंग्लंडचा कर्णधार असलेल्या इयाॅन मॉर्गनचा संघ सहकारी बनला.
सन 2010 च्या आयसीसी पुरस्कारांवर स्टर्लिंगने आपली छाप पाडली. सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू तसेच सहयोगी देशांतील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू असे दोन पुरस्कार त्याने आपल्या नावे केले. सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूंच्या पुरस्कारासाठी नामांकित झालेला तो सहयोगी देशांतील एकमेव खेळाडू होता.
स्टर्लिंगने सप्टेंबर 2010 मध्ये पहिले एकदिवसीय शतक ठोकले. कॅनडाविरुद्ध त्याने केवळ 134 चेंडूंत 21 चौकार आणि 5 षटकारांसह 177 धावा चोपल्या. एकदिवसीय सामन्यात स्टर्लिंगच्या 177 धावा ही कोणत्याही आयरिश फलंदाजाकडून केली गेलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. आयर्लंडने विश्वचषक 2011 मध्ये इंग्लंडला हरवण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. याच सोबत त्यांनी या स्पर्धेत नेदरलँडचा देखील पराभव केला. 307 धावांचा पाठलाग करताना ईडन गार्डनवर स्टर्लिंगने कर्णधार विल्यम पोर्टरफिल्डसह 177 धावांची सलामी दिली. स्टर्लिंगने 72 चेंडूंत 101 धावा केल्या आणि आयर्लंडला 14 चेंडू राखून विजय मिळवून दिला. 70 चेंडूत झळकावलेले हे शतक विश्वचषक इतिहासातील चौथे वेगवान शतक होते. 23 वर्षांचा होण्यापूर्वी पाच एकदिवसीय शतके ठोकण्याच्या अनोखा पराक्रम स्टर्लिंगने केला आहे. आयर्लंडला कसोटी क्रिकेटची मान्यता मिळेपर्यंत सहयोगी देशांकडून अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू होता. तो वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये दाखल झालेला.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये एक आक्रमक खेळाडू अशी ओळख असलेला स्टर्लिंग, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये देखील तितकाच प्रभावशाली ठरला मात्र त्याला पुरेशी संधी मिळाली नाही. 2014 च्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये ख्रिस रॉजर्स, इयॉन मॉर्गन, डेव्हिड मलान यांसारख्या दिग्गज खेळाडूं समवेत मिडल्सेक्ससाठी खेळताना, त्याने सहा सामन्यात 43.87 च्या सरासरीने 351 धावा जमविल्या होत्या. 2018 मध्ये खेळलेल्या पहिल्या अधिकृत कसोटी सामन्यात तो आयर्लंड संघाचा भाग होता.
स्टर्लिंगने आत्तापर्यंत 154 एकदिवसीय सामन्यांमध्ये आयर्लंडचे प्रतिनिधित्व करताना 38.34 च्या सरासरीने 5598 धावा तसेच आपल्या मध्यमगती गोलंदाजीद्वारे 43 बळी मिळवले आहेत. स्टर्लिंग आयर्लंडकडून सर्वाधिक टी20 धावा काढणारा फलंदाज आहे. स्टर्लिंगने 131 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळत 3011 धावा फटकावल्या आहेत. सर्वाधिक टी20 धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.
गेली 14 वर्ष आयर्लंड क्रिकेटची सेवा करणारा स्टर्लिंग सध्या आयर्लंड क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत आहे.
हेही वाचा-
बिग ब्रेकिंग! दिग्गज क्रिकेटरचे 49व्या वर्षी निधन, पत्नीने सोशल मीडियावरून दिली माहिती
फक्त खेळ बदलला! भारताकडून पाकिस्तानचा दारून पराभव