जगप्रसिद्ध टी२० लीग अर्थातच इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाची जय्यत तयारी सुरू आहे. १८ फेब्रुवारी रोजी या हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. तत्पुर्वी आयपीएलच्या गवर्निंग काउंसिलने लिलावात उतरवण्यात येणाऱ्या २९२ खेळाडूंच्या नावाची यादी जाहीर केली आहे. सोबतच खेळाडूंच्या मुळ किंमतीही ठरवल्या आहेत. त्यानुसार चेन्नई सुपर किंग्सने मुक्त केलेल्या हरभजन सिंग आणि केदार जाधव यांना २ कोटींची मुळ किंमत असलेल्या खेळाडूंच्या यादीत जागा मिळाली आहे.
दोन कोटींपासून बोलीची सुरुवात होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अवघ्या १० जणांना स्थान मिळाले आहे. यामध्ये हरभजन आणि जाधव या २ भारतीयांचा समावेश आहे. तर उर्वरित ८ परदेशी खेळाडू असून ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुड अशी त्यांची नावे आहेत.
आश्चर्याची बाब अशी की, उजव्या हाताचा फलंदाज जाधव हा मागील काही वर्षात सपशेल फ्लॉप ठरला आहे. गतवर्षी चेन्नई संघाचे प्रतिनिधित्त्व करताना त्याने ८ सामन्यात फक्त ६२ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी २६ धावा इतकी राहिली होती. दुसरीकडे अनुभवी फिरकीपटू हरभजनने वैयक्तिक कारणामुळे आयपीएल २०२० मधून माघार घेतली होती. त्यामुळे तो मागील वर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसला नव्हता. असे असतानाही, यंदा त्यांना २ कोटी मुळ किंमत असलेल्या खेळाडूंच्या यादीत जागा देण्यात आली आहे.
कोणत्या खेळाडूंची मुळ किंमत किती?
याव्यतिरिक्त आयपीएल २०२१ लिलावात एकूण १२ खेळाडू असे आहेत, ज्यांची मुळ किंमत १.५ कोटी असेल. तर १ कोटी मुळ किंमत असणारे एकूण ११ खेळाडू असतील. यामध्ये हनुमा विहारी आणि उमेश यादव या भारतीयांचा समावेश आहे. त्याहून कमी किंमतीत अर्थात ७५ लाख रुपयांपासून १५ खेळाडूंची बोली सुरू होईल. तर तब्बल ६५ खेळाडूंची मुळ किंमत ५० लाख असेल. या ६५ खेळाडूंमध्ये १३ भारतीय तर ५२ परदेशी खेळाडू असतील.
अशात आयपीएल २०२१ च्या लिलावात कोणत्या खेळाडूसाठी सर्वाधिक रुपयांची बोली लागेल आणि कोण स्वस्तात जाईल?, हे पाहणे उत्सुकतेचे ठरले.
महत्त्वाच्या बातम्या-
अक्रमसारखा वेगवान गोलंदाज बनण्याची स्वप्ने पाहणारा नदीम ‘असा’ बनला फिरकीपटू
पंतच्या जबरा फलंदाजीने डगमगडला इंग्लिश गोलंदाजाचा विश्वास, क्रिकेट सोडण्याचे बनवले होते मन