टीम इंडियामध्ये स्थान मिळवणं हे भारतातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. परंतु हे स्वप्न फार कमी खेळाडू पूर्ण करू शकतात. अनेक खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये कठोर परिश्रम करतात, ज्यानंतर त्यांना भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळते. मात्र काही खेळाडू असे आहेत, ज्यांना सातत्यानं चांगली कामगिरी करूनही कधीच संधी मिळत नाही. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं अशाच एका खेळाडूचा मुद्दा उपस्थिती केला आहे.
या खेळाडूचं नाव आहे जलज सक्सेना. तो रणजी ट्रॉफी 2024-25 मध्ये केरळकडून खेळतो. जलजनं अलीकडेच स्पर्धेत 6000 धावा आणि 400 बळी घेण्याचा विक्रम केला. हा रणजी ट्रॉफीमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला अष्टपैलू खेळाडू आहे. आता हरभजन सिंगनं जलजच्या या चमकदार कामगिरीचं कौतुक करत त्याची निदान भारत ‘अ’ संघासाठी तरी निवड व्हायला हवी होती, असं म्हटलं.
हरभजन सिंगनं एक ट्विट करत जलज सक्सेनाला पाठिंबा दिला आहे. “जलजची किमान भारत अ संघामध्ये निवड व्हायला हवी होती. आता रणजी खेळून उपयोग काय? केवळ आयपीएलमधूनच खेळाडू निवडले जातात”, असं हरभजन म्हणाला. तुम्ही भज्जीचं हे ट्विट येथे पाहू शकता.
जलजनं आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 143 फर्स्ट क्लास, 104 लिस्ट ए आणि 70 टी20 सामने खेळले आहेत. 222 प्रथम श्रेणी डावांमध्ये त्यानं 33.97 च्या सरासरीने 6795 धावा केल्या, ज्यात 14 शतकं आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं 235 डावांत गोलंदाजी करताना 25.68 च्या सरासरीनं 452 बळी घेतले. जलजनं लिस्ट-ए सामन्यांमध्ये 3 शतकं आणि 7 अर्धशतकं झळकावली आहेत.
याशिवाय जलजनं लिस्ट-ए च्या 90 डावात 2035 धावा केल्या आणि 94 डावात 117 विकेट्स घेतल्या. टी20 च्या 51 डावांमध्ये फलंदाजी करताना 661 धावा केल्या आणि 62 डावात गोलंदाजी करताना 72 विकेट घेतल्या. त्यानं टी20 मध्ये एक अर्धशतकही झळकावलं आहे.
हेही वाचा –
दोन खेळाडू आज पदार्पण करणार? दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अशी असू शकते भारताची प्लेइंग 11
5 दिग्गज भारतीय क्रिकेटपटू जे वनडे पदार्पण सामन्यातच झाले शून्यावर बाद!
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतापुढे झुकला पाकिस्तान, भारताच्या सामन्यांचे ठिकाण बदलणार?