आयपीएल २०२२ स्पर्धेला येत्या काही महिन्यात सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत अनेक मोठ मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेत लखनौ आणि अहमदाबाद या दोन्ही संघांनी प्रवेश केला असून, खेळाडूंचा मेगा लिलाव देखील करण्यात येणार आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स संघातील अनुभवी खेळाडू हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या नवीन संघात प्रवेश करताना दिसून येऊ शकतात.
गेली सात वर्ष हार्दिक आणि कृणाल या दोन्ही भावांनी मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच या संघाच्या विजयात मोलाचे योगदान देखील दिले आहे. तसेच मुंबई इंडियन्स संघ कुठल्या खेळाडूंना आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी रिटेन करेल याचा निर्णय२ ३० नोव्हेंबरपर्यंत लागेल. त्यापूर्वी काही मोठ्या अपडेट समोर येत आहेत. ज्यामध्ये चाहते देखील आश्चर्यचकित होत आहेत.
असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी हार्दिक आणि कृणालला रिलीज करणार आहेत. हे दोघेही पुढील हंगामात अहमदाबाद संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसून येऊ शकतात.
मुंबई इंडियन्स संघ आयपीएल २०२२ मध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि कायरन पोलार्ड यांना रिटेन करण्याच्या विचारात आहे. तसेच, ईशान किशनचे नावही रिटेन ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंमध्ये पुढे येत आहे. याचा अर्थ असा की, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांच्यात चुरशीची लढत होऊ शकते.
तर चेन्नई सुपर किंग्स संघ एमएस धोनी, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड यांना रिटेन करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच चौथा खेळाडू म्हणून सॅम करन आणि मोईन अली यांच्यात स्पर्धा आहे. दिल्ली कॅपिटल्स संघ रिषभ पंत, अक्षर पटेल आणि पृथ्वी शॉ यांना रिटेन करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए रिटेन होणारा दिल्लीचा चौथा खेळाडू असेल.






