टी२० विश्वचषकात भारतीय संघाचे प्रदर्शन चांगले झाले नाही. भारतीय संघ सुपर१२ च्या पुढे जाऊ शकला नाही. यामागे अनेक कारणे असले तरी, हार्दिक पंड्याचा फॉर्म आणि फिटनेस हे देखील एक कारण होते. पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही कर्णधार विराट कोहलीने पंड्याच्या फलंदाजीची क्षमता लक्षात घेऊन त्याला प्लेइंग-११ मध्ये समाविष्ट केले. मात्र, यामुळे संघाचे संतुलन बिघडले आणि त्याचा फटका भारतीय संघाला सहन करावा लागला. त्यामुळे हार्दिक पंड्याला न्यूझीलंड विरुद्धच्या आगमी टी२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. संघात जागा मिळवण्यासाठी पंड्याला स्वतः ला सिद्ध करावे लागेल.
याप्रकरणी बीसीसीआय आणि निवड समितीनेही नाराजी व्यक्त केली असून आता हार्दिक पंड्याला संघात पुनरागमनाचा मार्ग सोपा नसेल. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून वगळून बीसीसीआयने याचे संकेत दिले आहेत. आता संघात पुनरागमन करण्यासाठी पंड्याला आधी त्याचा फिटनेस परत मिळवावा लागेल आणि नंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करावे लागेल.
एका निवडकर्त्याने सांगितले की, ‘हार्दिक पंड्याला वगळण्यात आले आहे आणि जर त्याला पुनरागमन करायचे असेल तर त्याआधी त्याचा फॉर्म आणि फिटनेस सिद्ध करावा लागेल. हार्दिक पंड्या फलंदाज म्हणून संघात बसत नाही. पंड्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले जाईल आणि जर त्याचा संघात समावेश करायचा असेल, तर त्याआधी त्याला त्या स्तरावर चांगली कामगिरी करावी लागेल.’
पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक होणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय आणि निवड समितीने ४ ते ५ वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू खेळाडूंचा शोध सुरू केला आहे. या कारणास्तव निवड समितीने १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठी हार्दिक पंड्याऐवजी व्यंकटेश अय्यरची निवड केली आहे.
टी२० विश्वचषक २०२१ दरम्यान, हार्दिक पंड्याचा फॉर्म आणि फिटनेस भारतीय संघ व्यवस्थापनासाठी अडचणी वाढवणारा ठरला होता. पंड्याचा संघाला फलंदाजी किंवा गोलंदाजी यापैकी एकाही गोष्टीत मोठा उपयोग होऊ शकला नाही. त्याने स्पर्धेत फक्त ४ षटके टाकली आणि ५ सामन्यात फक्त ६९ धावा केल्या. फॉर्म आणि फिटनेससाठी झगडत असलेला या अष्टपैलू खेळाडूच्या अडचणीत कमी होणार नाहीत, कारण बीसीसीआयनेही याप्रकरणी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीकडून अहवाल मागवला आहे, असे समजते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘एका सामन्याच्या आधारावर राहुल चाहरला कसं वगळलं?’, माजी क्रिकेटरने उपस्थित केला प्रश्न
सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ‘जस्टीस फॉर संजू सॅमसन’ हॅशटॅग; गंभीर आहे कारण
पुजारा-रहाणे यांना निरोप देण्याची तयारी सुरू, शुबमन गिलला मिळणार नवी जबाबदारी?






