अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या या मालिकेतून बाहेर झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तो पायाला झालेल्या दुखापतीमुळे या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला मुकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पूर्णपणे फिट होता आणि तो २ जूनपासून बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेंसमध्ये (बंगळुरू) कसून सरावही करत होता. तो ११ जून रोजी धरमाशाला येथे शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघात सामील होणार होता, मात्र अखेरच्या क्षणी त्याला दुखापत झाली असल्याचे समोर येत आहे. यामुळे तो आणखी दोन आठवडे बंगळुरूमध्ये राहणार आहे.
अगदी शेवटच्या क्षणी भारतासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. हार्दिकच्या पायाला किरकोळ दुखापत (मोच) झाली आहे, मात्र त्याला वेदना होत आहेत. ही दुखापत लवकरच सुधारणारी आहे. तरीही वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला पुढील काही दिवस पायावर कोणताही ताण किंवा वजन न टाकण्याचा सल्ला दिला आहे.
हार्दिक सुमारे एक वर्षानंतर वनडे फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज होता. आता हा ३२ वर्षीय खेळाडू आगामी वनडे मालिकेला मुकणार असल्याने त्याच्याजागी कोण खेळणार याची अद्याम घोषणा झालेली नाही. संघ व्यवस्थापन लवकरच त्याची घोषणा करेल. काही भारतीय संघाचे खेळाडू बुधवारी (१० जून) मोहालीमध्ये पोहोचणार आहेत. तसेच गुरूवारी धरमशालेला रवाना होण्याआधी ते आयएस बिंद्रा स्टेडियमवर सराव सत्रात सहभागी होणार आहेत.
या मालिकेतून अनुभवी फलंदाज विराट कोहली दुखापतीमुळे बाहेर झाला आहे. त्याला आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्याच्याजागी यशस्वी जायस्वालचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली असून त्याची संघात निवड करण्यात आली नाही. आता हार्दिकही या मालिकेला मुकणार असल्याने कर्णधार शुबमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची डोकेदुखी वाढली आहे.
अफगाणिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, यशस्वी जायस्वाल, नितिश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्ष दुबे, केएल राहुल, इशान किशन, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव आणि गुरनूर ब्रार. (हार्दिकबाबत अद्याप अधिकृत घोषणा व्हायची असून बीसीसीआय लवकरच त्याचा बदली खेळाडू जाहीर करेल)






