भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर या मालिकेला मंगळवारी (3 जानेवारी) सुरुवात होईल. भारतीय संघाचे नेतृत्व अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्याकडे आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना हार्दिकने नवीन वर्षात विश्वचषक हाच आपला संकल्प असल्याचे म्हटले.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्याआधी हार्दिकने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्याला या पत्रकार परिषदेत नवीन वर्षाच्या संकल्पविषयी विचारले गेले. त्याला उत्तर देताना हार्दिक म्हणाला,
“दरवर्षी प्रत्येकाचे संकल्प असतातच. मात्र, यावेळी सर्वांनी मिळून संकल्प केलेला आहे की, यावर्षी होणारा वनडे विश्वचषक आपल्याला जिंकायचा आहे. हेच ध्येय घेऊन आम्ही विश्वचषकात उतरू.”
यावर्षी प्रथमच केवळ भारत विश्वचषकाचे आयोजन करणार आहे. ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या या विश्वचषकासाठी भारतीय संघाला विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहे. भारताने अखेरच्या वेळी 2011 मध्ये विश्वचषक आपल्या नावे केलेला. त्यानंतरच्या दोन्ही विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीतून बाहेर पडावे लागले.
तत्पूर्वी, श्रीलंकेविरुद्ध भारत वर्षाची सुरुवात करेल. हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई येथे पहिला सामना खेळला जाईल. मालिकेतील दुसरा सामना पुणे येथे तर तिसरा राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. या मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करेल.
श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी व मुकेश कुमार.
(Hardik Pandya said The biggest new year resolution is to win the World Cup)