भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू हार्दिक पांड्या (hardik pandya) आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये एक नवीन सुरुवात करणार आहे. आतापर्यंत तो एका खेळाडूच्या रूपात आयपीएलमध्ये खेळत होता, पुढच्या हंगामात तो अहमदाबाद संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. आयपीएलमध्ये नव्याने सामील होणाऱ्या अहमदाबाद संघाने मेगा लिलावापूर्वी हार्दिक पांड्या, राशिद खान आणि शुभमन गिल यांना संघात रिटेन केले आहे. अशात आता हार्दिकने संघाच्या कर्णधारपदाविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
यापूर्वी हार्दिक रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्ससाठी खेळत आला आहे. यावर्षी पहिल्यांदाच तो एका आयपीएल संघाचे नेतृत्व करणार आहे. यासंदर्भात क्रिकबजशी बोलताना हार्दिक म्हणाला की, “कर्णधार बनण्याची पद्धत शिकण्यासाठी कोणता दुसरा मार्ग नाहीय. मी नेहमीच एक असा व्यक्ती राहिलो आहे, ज्याला जबाबदारी घ्यायला आवडते आणि त्या आव्हानाची वाट पाहत आहे. एका कर्णधाराच्या रूपात मला हे सुनिश्चित करायचे आहे की, सर्व खेळाडूंना माझ्याकडून पुरेसा वेळ दिला जाईल. मी हेच शिकलो आहे आणि इच्छा आहे की, माझे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमी उघडे असतील.”