मेलबर्न। आज(८ मार्च) जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर मैदनात उतरताच तिच्या नावावर एक खास विक्रम झाला आहे.
हरमनप्रीत कौरचा आज ३१ वा वाढदिवस आहे. तिचा हा वाढदिवस खास ठरला आहे. कारण ती वाढदिवसाच्या दिवशी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्तव करत आहे. याबरोबरच हरमनप्रीत कौर आयसीसीच्या महिला आणि पुरुष मिळून कोणत्याही स्पर्धेतील अंतिम सामन्यात वाढदिवसाच्या दिवशी एका संघाचे नेतृत्व करणारी पहिली कर्णधार ठरली आहे.
याआधी महिला किंवा पुरुष कर्णधारांनी आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेतील अंतिम सामन्यात वाढदिवसाच्या दिवशी नेतृत्व केलेलं नाही.
विशेष म्हणजे हरमनप्रीत कौर ही भारताची टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नेतृत्व करणारीही पहिली महिला कर्णधार ठरली आहे.






