भारत विरुद्ध इंग्लंड संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेला चेन्नई येथून शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावामध्ये कर्णधार जो रुटने द्विशतकी धमाका केला. त्यामुळे त्याची चर्चा जोरदार सुरु आहे. एकीकडे ही चर्चा असताना दुसरीकडे आयपीएलच्या १४ व्या हंगामाच्या लिलावाचीही चर्चा आहे. त्यातच रुटने यंदाच्या आयपीएल लिलावासाठी नाव न नोंदवल्यानेही तो चर्चेत आला आहे.
याचदरम्यान नुकतेच रुटने शनिवारी (६ फेब्रुवारी) भारताविरुद्ध द्विशतकी खेळी केली. त्याआधी त्याने सामन्याच्या पहिल्याच दिवशी नाबाद शतक केले होते. त्याच्या या खेळीनंतर आयपीएलमधील सध्या खेळत नसलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या मालकांनी म्हणजेच हर्ष गोयंका यांनी त्याचे कौतुक करताना एक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की रुटने त्यांना विचारले होते की त्याला आयपीएलमध्ये कोणताही संघ का घेत नाही.
गोयंका यांनी ट्विट केले आहे की ‘१०० व्या कसोटी सामन्यात शतक. सलग तिसऱ्या कसोटीत शतक! जो रुट मला एकदा भेटला होता, आणि त्याने मला विचारले होते की कोणताही संघ त्याला आयपीएलमध्ये का निवडत नाही आणि संघाने निवड करावी म्हणून त्याला आणखी काय करावे लागेल.’
100 in his 100th test match, third in a row- what a masterful innings! #JoeRoot
Yet, when he met me he was asking me why no teams are choosing him for IPL and what does he need to do more!— Harsh Goenka (@hvgoenka) February 5, 2021
खरंतर रुटने गेले २ वर्षांपासून आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेसाठी नाव नोंदणी करणे बंद केले आहे. त्याआधी त्याने अनेकदा आयपीएल लिलावासाठी नाव नोंदणी केली होती . मात्र, तो अनसोल्ड राहिला आहे, म्हणजेच त्याच्यासाठी कोणत्याच संघाने पसंती दाखवली नाही.
विशेष म्हणजे रुटला सध्याच्या काळातील केन विलियम्सन, स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहलीसह सर्वोत्तम चार फलंदाजांमध्ये गणले जाते. मात्र अन्य तिघेही विविध टी२० स्पर्धांमध्ये आणि आयपीएलमध्ये खेळताना दिसतात. पण, रुट मात्र काहीसा टी२० लीगपासून दूरच आहे. तो २०१८-१९ सालामध्ये एकदाच बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर्ससाठी खेळला होता. ही एकमेव टी२० लीग त्याने खेळली आहे.
रुटचे १०० व्या कसोटीत द्विशतक-
सध्या चेन्नईत सुरु असलेल्या भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीदरम्यान रुटने पहिल्या डावात ३७७ चेंडूत २१८ धावा केल्या. या खेळीत रुटने १९ चौकार आणि २ षटकार मारले. तसेच चेन्नई येथे भारताविरुद्ध सुरु असलेला हा सामना रुटचा १०० वा कसोटी सामना असल्याने तो १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित शर्माने केली हरभजनच्या गोलंदाजीची नक्कल, व्हिडिओ तुफान व्हायरल
….म्हणून माझ्याकडून वारंवार नो बॉल टाकल्या गेले, शाहबाज नदीमने दिले स्पष्टीकरण