इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात ५ वेळेस आयपीएलचे जेतेपद पटकावण्याऱ्या मुंबई इंडियन्स संघाला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने २ गडी राखून पराभूत केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा अष्टपैलू खेळाडू हर्षल पटेल हा या विजयाचा एक शिल्पकार ठरला. हर्षलने मुंबई इंडियन्स संघातील फलंदाजांची कंबर मोडत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. परंतु हर्षलने क्रिकेट खेळण्यासाठी किती मोठ्या त्याग केला आहे, याची तुम्हाला कल्पना ही नसेल.
हर्षल पटेलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी अजून तरी मिळाली नाही. परंतु, या ३० वर्षीय गोलंदाजाने हरियाणा संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्याबद्दल, आम्ही एक गोष्ट सांगणार आहोत जी खूप कमी लोकांना माहीत असेल. २००५ साली त्याच्या कुटुंबासोबत त्याला अमेरिकेत जाण्याची संधी होती. परंतु क्रिकेटवर असलेल्या प्रेमापोटी त्याने भारतातच राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये त्याचा भाऊ तपन पटेलने मोलाची भूमिका बजावली.
अशी झाली क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात
हर्षलने २००८-०९ मध्ये झालेल्या १९ वर्षाखालील विनू मंकड ट्रॉफी स्पर्धेत तब्बल २३ गडी बाद केले होते. याच कामगिरीच्या जोरावर त्याची १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत निवड करण्यात आली होती. तसेच त्याला गुजरातच्या वरिष्ठ संघात देखील स्थान मिळाले होते. त्यानंतर त्याने २०११ मध्ये हरियाणाकडे आपला मोर्चा वळवला. हरियाणा संघाकडून खेळताना त्याने २०११ -१२ च्या रणजी हंगामात उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रत्येकी ८ गडी बाद केले होते.
प्रथम श्रेणी आणि टी२० क्रिकेटमध्ये केली आहे उल्लेखनीय कामगिरी
हर्षल पटेलने आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ६४ सामने खेळले आहेत.यात त्याने तब्बल २२६ गडी बाद केले आहेत. यामध्ये त्याने १२ वेळेस डावात ५ गडी बाद करण्याचा आणि २ वेळेस सामन्यात १० गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. गोलंदाजीसह त्याने फलंदाजीमध्ये ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने या सामन्यांमध्ये १३६३ धावा केल्या आहेत.
टी२० क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर त्याने ९७ सामन्यांमध्ये १०३ गडी बाद केले आहेत. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याला ५७ सामन्यात ८० गडी बाद करण्यात यश आले आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिल्या सामन्यात केली चमकदार कामगिरी
आयपीएल २०२१ हंगामाच्या पहिल्या सामन्यांत बेंगलोरविरुद्ध पहिल्या सामन्यात मुंबईने १३ षटकांच्या आतच १०० धावांचा आकडा पार केला होता. मात्र, त्यानंतर मुंबईच्या नियमित कालांतराने विकेट्स गेल्या. हार्दिक पंड्या आणि इशान किशनला हर्षल पटेलने त्याच्या वैयक्तिक लागोपाठच्या २ षटकात पायचीत केले. हार्दिक १३ धावांवर बाद झाला तर किशन २८ धावांवर बाद झाला.
त्यानंतर २० व्या षटकापर्यंत मुंबईने १५० धावांचा टप्पा पार केला. मात्र, २० व्या षटकाच्या पहिल्या २ चेंडूवर हर्षल पटेलने कृणाल पंड्या(७) आणि किरॉन पोलार्डला(७) लागोपाठ बाद केले. तर याच षटकात चौथ्या चेंडूवर मार्को जेन्सनला त्याने त्रिफळाचीत केले. यासह हर्षलने या सामन्यात ४ षटकांत २७ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तसेच आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला १६० धावांवर रोखण्यात मोलाचा वाटा उचलला.
महत्त्वाच्या बातम्या –
तेराव्या हंगामाखेर चाहत्यांना दिलेला शब्द धोनी आज खरा करुन दाखवणार? पाहा काय होते ते वचन
MI की RCB, सिडनीच्या ‘त्या’ व्हायरल जोडप्याचा पाठिंबा कोणाला? पाहा त्यांची टीम हारली का जिंकली?
ग्लेन मॅक्सवेलवरुन बेंगलोर आणि पंजाब आमने-सामने; रंगले ट्विटर वॉर